प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांची लवकरच चर्चा

मुंबई : टाळेबंदी लागू झाल्यापासून बंद असलेली उपाहारगृहे आणि व्यायामशाळा सुरू करण्याबाबत सरकारच्या पातळीवर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. या आठवडय़ात उपाहारगृहे आणि व्यायामशाळा मालकांच्या प्रतिनिधींबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चर्चा करणार आहेत.

उपाहारगृहे आणि व्यायामशाळा पुन्हा सुरू करण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. अर्थचक्र  गतिमान करण्याकरिता या दोन्हींना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सरकारने निवासाची सुविधा असलेल्या हॉटेल्सना परवानगी दिली. उपाहारगृहांमधून खाद्यपदार्थ घरपोच नेण्यास परवानगी असली तरी तेथे बसून खाता येत नसल्याने उपाहारगृहांचे चालक आणि ग्राहक या दोघांना त्याचा फटका बसतो.  दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारकडे के लेल्या मागणीनुसार या आठवडय़ात मुख्यमंत्री ठाकरे हे उपाहारगृहे आणि व्यायामशाळा मालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. समाजमाध्यमातून साधलेल्या संवादातही मुख्यमंत्र्यांनी उपाहारगृहांमध्ये कोणते सुरक्षेचे उपाय योजावे लागतील असे सांगत उपाहारगृहे सुरू करण्याचे सूतोवाच केले.