अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्याने जामिनावर सुटताच पुन्हा त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पीडितेच्या आईने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

कर्जत तालुक्यातील ज्योतीबाची वाडी येथील अल्पवयीन मुलीस दोन महिन्यापूर्वी कोकणगांव, तालुका कर्जत येथील दत्तात्रय लक्ष्मण सातपुते याने पळवून नेले होते. या वेळी २६ दिवसांनंतर आमची मुलगी आम्हाला सापडली होती. या प्रकरणी दत्तात्रय यास आमच्या तक्रारीवरून त्याचेवर गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटकही झाली, मात्र त्याला सध्या जामीन मिळाला आहे. या घटनेनंतर बुधवारी (११ जानेवारी) या पीडितेच्या आईने कर्जत पोलीस स्टेशनला दत्तात्रय आणि त्याच्या मित्राने मुलीचे पुन्हा अपहरण केल्याची तक्रार दिली आहे.

येसवडी येथे मुलींची छेडछाड होत असल्याची विद्यार्थिनींची तक्रार कर्जत तालुक्यातील येसवडी येथील बसस्थानकावर अवैद्य दारूचे दुकान सुरू असून तिथे असलेला मुलगा व त्याचे काही मित्र हे तिथेच रस्त्यावर उभे राहतात व  शाळेत जाणाऱ्या-येणाऱ्या मुलींची छेड काढतात, अशी तक्रार विद्यार्थिनींनी दिली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत व त्यांनी जिल्हापोलीस अधीक्षक, कर्जतचे पोलीस निरीक्षक व राशीनचे पोलीस उपनिरीक्षक यांना तक्रारी अर्ज दिले आहेत. येसवडी येथील बसस्थानकावर राजरोस सुरू असलेले अवैद्य दारूचे दुकान बंद करावे व या रोडरोमियोंचा कायमचा बंदोंबस्त करावा अशी मागणी केली आहे. जर पोलिसांनी बंदोबस्त केला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी संबंधित चारही मुलांना कर्जत पोलिसांनी समज दिली आहे.