28 November 2020

News Flash

उष्णतेची तीव्र लाट

चंद्रपूरचे तापमान ४५.२ अंश सेल्सिअस

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

चंद्रपूरचे तापमान ४५.२ अंश सेल्सिअस

गुजरात व राजस्थानमध्ये सुरू असलेली उष्णतेची लाट तीव्र असतानाच मध्य महाराष्ट्र व विदर्भातही तापमापकातील पाऱ्याने जोरदार उसळी घेतली आहे. गेले काही दिवस ४० अंश से.च्या फेऱ्यात अडकलेल्या पाऱ्याने शनिवारी तब्बल ४५ अंश से.ची उंची गाठली. राज्यातील उष्णतेची लाट पुढील किमान तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकणपट्टीत तापमान ४० अंश से.पर्यंत पोहोचले नसले तरी हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

या वर्षी उष्णतेच्या लाटांची संख्या व तीव्रता अधिक असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नोंदवला होता. त्याची प्रचीती उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात तापमान काहीसे कमी झाले होते. मात्र या आठवडय़ात तापमानाने पुन्हा ऊध्र्व दिशेने प्रवास सुरू केला आहे. विदर्भात साधारण ४० अंश से.वर असलेला पारा शनिवार तब्बल ५ अंश से.हून अधिक वर गेला. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक, ४५.२ अंश से. तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नागपूर, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा येथील पाराही ४४ अंश से.हून अधिक वर गेला. मराठवाडय़ात परभणी येथे ४३ अंश से.ची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्रात जळगाव येथे ४४ अंश से. तापमान राहिले. पुणे, नाशिक, सांगली, सातारा यांनी चाळिशी तर लोहगाव, अहमदनगर, मालेगाव, सोलापूर बेचाळिशी गाठली.

कोकण प्रांतात कमाल तापमान ३५ अंश से.च्या खाली राहिले. मुंबईत सांताक्रूझ येथे ३३.६ अंश से., कुलाबा येथे ३४.८ अंश से., अलिबाग येथे ३६ अंश से., रत्नागिरी येथे ३२ अंश से. तर डहाणू येथे ३४ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली. गेले काही दिवस चच्रेत असलेल्या भिरा येथे शनिवारी ४२ अंश से. कमाल तापमान होते. उर्वरित राज्यापेक्षा कोकणपट्टीतील तापमान कमी असले तरी हवेतील बाष्पामुळे होणाऱ्या उकाडय़ाचे प्रमाण अधिक आहे. त्याच वेळी राज्यात इतरत्र रात्रीचे तापमान २० अंश से.पर्यंत उतरत असले तरी शनिवारी मुंबईतील कुलाबा येथील तापमान २८ अंश तर सांताक्रूझ येथील तापमान २६ अंश से.पेक्षा खाली उतरले नाही. मध्य महाराष्ट्रात रविवार ते मंगळवापर्यंत तर विदर्भात शनिवार ते बुधवापर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. सोमवारी व मंगळवारी उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक होईल, असा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:23 am

Web Title: maharashtra current weather at 45 degrees celsius
Next Stories
1 इमानला कायमचे अपंगत्व
2 शेतकऱ्यांना कांद्याला एक रुपयाच अनुदान
3 मोदींच्याच नेतृत्वाखाली २०१९च्या निवडणुका
Just Now!
X