मुंबईसह सर्वत्र तापमानवाढ; विदर्भ-मराठवाडय़ात पारा चाळिशीपार

मार्च महिना संपत येत असताना मुंबईसह राज्यभरातील उकाडय़ात मोठी वाढ झाली असून, त्याने नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भ-मराठवाडय़ात तर अनेक ठिकाणी तापमापकातील पारा चाळिशीच्या पार गेल्याने, सरासरी तापमानात वाढ झाल्याचे दिसते आहे.

मुंबईत शनिवारी कुलाबा येथे ८६ टक्के आणि सांताक्रूझ येथे ७३ टक्के इतके आद्र्रतेचे प्रमाण नोंदले गेले होते. आणि तापमान कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे ३४.६ सेल्सिअस इतके होते. रविवारी मुंबईतील आद्र्रतेचे प्रमाण बऱ्यापैकी घटले. कुलाबा येथे ६५ टक्के आणि सांताक्रूझ येथे ३९ टक्के अशी त्याची नोंद झाली. तर, रविवारी, सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत कुलाबा येथे ३१ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. आद्र्रता कमी होऊनही रविवारी दिवसभर मुंबई-ठाण्यात विलक्षण उकाडा जाणवत होता. दुपार तर मुंबई-ठाणेकरांना अक्षरश भाजून काढणारी होती. रविवारची सुट्टी असल्याने नागरिकांनी बाहेर जाणे शक्यतो टाळलेच.

विदर्भात वर्धा (४१.५ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (४१.४ अंश), गोंदिया (४१.२ अंश), अमरावती, ब्रह्मपुरी, यवतमाळ (४१ अंश), मराठवाडय़ात परभणीमध्ये (४१.३ अंश), मध्य महाराष्ट्रात सोलापूर (४१.४ अंश), तर उत्तर मध्य महाराष्ट्रात जळगावमध्ये (४१ अंश) असे दिवसाचे तापमान चढेच होते. त्याबरोबर रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे.

‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) रविवारी सकाळी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार ३० मार्चपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळी घेतलेल्या नोंदीनुसार नागपूर, वाशिम, औरंगाबाद, नाशिक आणि सांगलीमध्येही कमाल तापमानाने ४० अंशांचा पल्ला ओलांडला. तर पुणे, लोहगाव, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा या ठिकाणी ते ३८ अंशांपेक्षा अधिक व ४० अंशांच्या जवळ जाऊन पोहोचले.

सर्वाधिक तापमान अकोल्यात

किनारपट्टीचा भाग वगळता संपूर्ण राज्यभर दिवसाचे तापमान लक्षणीयरीत्या वाढले आहे. विदर्भ- मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रातही कडक उन्हाच्या झळा त्रासदायक ठरू लागल्या आहेत. राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे (४२.८ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. त्याखालोखाल मालेगावमध्ये ४२.४ अंश तापमान होते. या दोन्ही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ४.५ अंश व ५.१ अंशांची वाढ दिसून आली.