मुंबईत झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याच्या न्यूयॉर्क टाईम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अ‍ॅनालिसीस कंपनीच्या दाव्यांवर महाराष्ट्राच्या सायबर सेलने आपला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये सायबर सेलने ३ गंभीर मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये मुंबईतल्या एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पूर्ण अहवाल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्या आधारावर आता सविस्तर तपास आणि चौकशी होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

सायबर सेलच्या अहवालातील गंभीर खुलासे

सायबर सेलने गृह विभागाला दिलेल्या अहवालामध्ये ३ मुख्य मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.

१) १४ ट्रोजन हॉर्सेस एमएसईबी मुंबईच्या प्रणालीमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा पुरावा मिळाला आहे.
२) ८ जीबी डाटा बाहेरच्या सर्व्हरमधून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर झालेला असू शकतो.
३) ब्लॅकलिस्टेड आयपी अ‍ॅड्रेसवरून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न झालेला असू शकतो.

…म्हणून चीननेच सायबर हल्ला करुन मुंबईची बत्तीगुल केली!

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भारत आणि चीनमधले द्वीपक्षीय संबंध ताणले गेले होते. दोन्ही देशांच्या सीमारेषेवर असलेल्या गलवान प्रांतामध्ये भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती. याच काळामध्ये १२ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अनेक भागांमधली वीज दिवसभरासाठी गायब झाली होती. काही भागांमध्ये तर थेट दुसऱ्या दिवशी वीज आली. ठाणे जिल्ह्यातल्या पडघा लोड डिस्पॅच सेंटरमध्ये ट्रिपिंग झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचं कारण समोर आलं होतं.

दरम्यान, आता न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृतानुसार रेकॉर्डेड फ्युचर या सायबर सेक्युरिटी कंपनीने यासंदर्भातला सविस्तर ब्लॉग प्रकाशित केला आहे. यामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवरच हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध लावल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मालवेअरचा वापर करून मुंबईला वीजपुरवठा करणारी यंत्रणा हॅक करण्यात आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.