मुंबईतील मेट्रोच्या २ ए आणि ७ या दोन मार्गिकांचं सोमवारी उद्घाटन झालं. उद्धाटनादरम्यान बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकार निशाणा साधत जोरदार टीका केली. आजपर्यंत केंद्रात कोणाचंही सरकार असलं तरी राज्यांना मदत देताना इतका भेदभाव झाला नव्हता अशी खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच याचा विचार होणं गरजेचं आहे, असंही म्हटलं. दरम्यान यावेळी व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अजित पवारांनी विनंती केली.

“रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला लागणाऱ्या मदतीबद्दल विचारपूस केली. त्यामुळे मी रामदास आठवले यांना तौते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी. तुम्ही दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटा आणि महाराष्ट्राला मदत मिळवून द्या,” अशी विनंती अजित पवार यांनी केली.

“गुजरातने मागणी केलेली नसतानाही पंतप्रधानांनी १००० कोटींची मदत जाहीर केली, पण महाराष्ट्राला कोणतीही मदत नाही,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

”तौते चक्रीवादळानंतर पंतप्रधान सर्वप्रथम मुंबईत येणार होते, त्यानंतर ते गुजरातला जाणार होते. मात्र काही कराणाने पंतप्रधानांचा इकडचा दौरा रद्द झाला, याचं कारण आम्हाला कळू शकलं नाही. परंतु पंतप्रधान थेट गुजरातला गेले अन् गुजरातची काही मागणी नसताना देखील तात्काळ त्यांनी १ हजार कोटी जाहीर केले. महाराष्ट्राला जेवढे योग्य वाटतील तेवढे तरी पैसे त्यांनी द्यायला हवे, त्यातही आम्ही समाधानी होऊ.” असं अजित पवार म्हणाले आहेत.

”राज्यकर्ते येत असतात, जात असतात… बदल होत असतात. शेवटी जनता निवडून देत असते. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमधून आपण सर्वांनी हे पाहिलं आहे. मागील काळात मनमोहन सिंग, शरद पवार, पी. चिदंबरम हे काम करत होते, तेव्हा असा भेदभाव कधी होत नव्हता. मात्र तो थोडासा जाणवतो आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे नाही याबाबत सगळ्यांनी नीट विचार करावा, एवढीच माझी निमित्त अपेक्षा आहे.” असंही अजित पवारांनी बोलून दाखवलं.