या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान तपासण्यात आलेल्या कोविड-१९च्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुन्यांमध्ये दुहेरी उत्परिवर्तन (डबल म्युटेशन) आढळले असल्याचा दावा एका जनुकीय क्रमनिर्धारणतज्ज्ञाने बुधवारी केला. तथापि, करोना महासाथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी नमुना तपासणीसाठी ज्या पद्धतींचा अवलंब करत आहेत, त्याबद्दल त्याने शंका व्यक्त केली.

तथापि, नमुन्यांचे इतके कमी प्रमाण हे उत्परिवर्तित विषाणूचे निर्देशक मानले जाऊ शकत नाही, असे मत जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) आणि पेशी विज्ञान (सेल सायन्स) या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी नोंदवले. हे ३६१ नमुने महाराष्ट्रातील जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले होते.

दुसऱ्या बाजूने, कोविड-१९चे नमुने दररोज गोळा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील, तसेच केंद्रीय जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांच्या नमुना विश्लेषणाबाबतच्या निष्कर्षांच्या संदर्भात संवादाचा अभाव असल्याची तक्रार केली आहे.

‘पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने तपासलेल्या कोविड-१९च्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुन्यांत दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याचे मला सांगण्यात आले. तथापि, महाराष्ट्रात दररोज सुमारे २ लाख चाचण्या होत असल्यामुळे ही नमुना संख्या अतिशय कमी आहे. उत्परिवर्तित विषाणूचा व्यापक फैलाव झाला असल्याचे कुणीही इतक्या कमी प्रमाणावरून ठरवू नये,’ असे एका वरिष्ठ जनुकीय क्रमनिर्धारणतज्ज्ञाने पीटीआयला सांगितले.

‘ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक आरोग्य अधिकारी दररोज या चाचण्या करत आहेत, ते नमुने गोळा करण्यासाठी अवलंबत असलेल्या पद्धतींबद्दल अलीकडेच चिंता व्यक्त करण्यात आली होती,’ असेही हा तज्ज्ञ म्हणाला. नमुने गोळा करण्याचे काम यादृच्छिक (रँडम) पद्धतीने व्हायला हवे यावर भर देतानाच, नाशिकहून पाठवण्यात आलेल्या नमुन्यांच्या एका विशिष्ट संचातील सर्व नमुन्यांमध्ये दुहेरी उत्परिवर्तन आढळले, याकडे या तज्ज्ञाने लक्ष वेधले.