निवासी डॉक्टरांच्या संपानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोनदा निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घेऊन पूर्ण सुरक्षेची हमी दिली. तथापि त्याकडे दुर्लक्ष करून संप सुरू ठेवून रुग्णांना वेठीला धरणाऱ्या ‘मार्ड’च्या डॉक्टरांच्या चार दिवसांच्या संपकाळात शेकडो शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. रुग्णांचे अतोनात हाल झाले आणि या कालावधीत पालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये  ५६६ रुग्णांचा मृत्यू ओढवला.

निवासी डॉक्टरांच्या या संपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेल्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) मात्र शुक्रवारी मुख्यमंत्र्यांशी विधिमंडळात झालेल्या चर्चेनंतर तात्काळ आपले आंदोलन मागे घेतले. ‘आयएमए’ने आंदोलन मागे घेतले असून आम्ही ‘मार्ड’च्या डॉक्टरांनाही समजावण्याचा प्रयत्न करत आहोत, असे आयएमएचे प्रमुख डॉ. जयंत लेले यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसऱ्यांना निवासी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना सुरक्षेसह त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगून संप मागे घेण्याची विनंती केली.     संपाच्या या चार दिवसात मुंबई महापालिकेच्या शीव, केईएम व नायर रुग्णालयातील सुमारे दोनशे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या व बाहय़रुग्ण विभाग तर  ठप्प होता. या चार दिवसात पालिका रुग्णालयांमध्ये १३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक व केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविशान सुपे यांनी दिली तर राज्य शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित १६ रुग्णालयांसह पालिका रुग्णालयांत मिळून गेल्या चार दिवसात ५६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगरे यांनी दिली.

डॉक्टरांचा मुजोरपणा अन् हतबल मुख्यमंत्री

संपकाळात रुग्णांचे अतोनात हाल झाल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे असून यापूर्वी निवासी डॉक्टरांच्या संप वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मागे घेतला जात असे आता मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा चर्चा करूनही निवासी डॉक्टरांनी आपला मुजोरपणा कायम ठेवला तर वैद्यकीय शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री हतबल असल्याचे पाहायला मिळाले. पंधरा दिवसात पूर्ण सुरक्षा मिळाली नाही तर मी राजीनामा देईन अशी हमी गिरीश महाजन यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी तर रुग्णांसाठी संपकऱ्यांच्या पाया पडण्याची तयारी दाखवली. मात्र हजारो रुग्णांना वेठीस धरत या निवासी डॉक्टरांनी न्यायालयापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत साऱ्यांनाच फसवण्याचे उद्योग केले असून यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असे मत पालिका रुग्णालयातील ज्येष्ठ अध्यापकांनी व्यक्त केले.