मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकेतून ‘अनुत्तीर्ण’ हा शेरा पुसून टाकण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावीसाठी चार वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला असून, आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही फेब्रुवारी-मार्च २०२०च्या परीक्षेपासून नवा निर्णय लागू होणार आहे.

विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शेरे पद्धती ३० ऑगस्ट २०१६ च्या आदेशानुसार लागू करण्यात आली होती. ती आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही अमलात आणण्यात येणार आहे. विद्यार्थी एक-दोन विषयांमध्ये किंवा तीनपेक्षाही अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास फेरपरीक्षेस पात्र (एलिजिबल फॉर री-एक्झाम) असा शेरा गुणपत्रिकेत नोंदवला जाणार आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत एक-दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेस पात्र असा शेरा नोंदविला जाणार असून, तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ‘कौशल्य विकास अभ्याक्रमासाठी पात्र’ असा शेरा नोंदवला जाईल.