कला, विज्ञान, वाणिज्य आणि स्वयंअर्थसहय्यीत अभ्यासक्रमांचे शुल्क वाढवण्याची संधी महाविद्यालय प्रशासनाला मिळणार आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार या अभ्यासक्रमांचे शुल्क वाढवण्यासाठी महाविद्यालयन प्रशासन शिक्षण शुल्क नियंत्रण समितीकडे प्रस्ताव मांडता येणार आहे. यामध्ये संबधित महाविद्यालय फीवाढीचे निकष पूर्ण करीत असेल तर शिक्षण शुल्क नियंत्रण समिती शुल्क वाढीची परवानगी देणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांत ‘स्वयंअर्थसहाय्यीत’ तत्त्वावर अनेक अभ्यासक्रमांना मान्यता दिली जाते. यामध्ये बीएमएस, बीएमएम, बीएएफ, बीएसस्सी आयटी, संगणक विज्ञान अशा विाविध अभ्यासक्रमांचा समावेश होतो. या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालय प्रशासन तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. शिवाय मोठय़ा प्रमाणात अत्याधुनिक साधनसामग्रीचा खर्चही मोठा असतो. मात्र मागणी करूनही या अभ्यासक्रमांचे शुल्क वाढवण्याची परवानगी मिळत नसल्याचे महाविद्यालय प्रशासनांकडून सांगण्यात येते. कला, विज्ञान, वाणिज्य आणि स्वयंअर्थसहय्यीत अभ्यासक्रमांचे शुल्क वाढ २००८-०९ या शैक्षणिक वर्षांत झाली होती. मात्र त्यांनतर शुल्क वाढ झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत शुल्कवाढीचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र विद्यार्थी संघटनांच्या प्रचंड विरोधामुळे विद्यापीठाला शुल्क वाढ करता आलेली नाही. या पाश्र्वभूमीवर नव्या कायद्यातील तरतुदीमुळे संस्थाचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक महाविद्यालयांमध्ये विद्याथ्ऱ्यांना अनिवार्य असणाऱ्या शैक्षणिक सुविधा दिल्या जात नाहीत. महाविद्यालयाचा कारभार अर्धवेळ प्राचार्याच्या भरवशावर सुरू असतो. असे असताना विद्यार्थ्यांकडून शुल्क मात्र दामदुपटीने वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे जर कुठलेही महाविद्यालयांना सुविधा न देता विद्यार्थ्यांवर नाहक शुल्क वाढीचा बोजा टाकत असेल तर युवा सेना जोरदार विरोध करेल असा इशारा माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिला.