दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. राज्यात पुन्हा शिवसेनेला सत्ता हवीच आहे, असे ठासून सांगत कुचराई करू नका, प्रामाणिकपणे काम करून विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकेचे बाण सोडले. शरद पवार, अजित पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं.

भाषणादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष शरद पवारांना उद्देशून म्हणाले की, २००० मध्ये सत्तेत असताना तुम्ही महाराष्ट्र धगधगता ठेवला होतात. तेव्हा शिवसेनाप्रमुखांवर खटला का दाखल केला होता. १९९२-९३ मध्ये बाबरी कुठे पडली, पण बाळासाहेबांवर खटला इथं मुंबईत झाला. त्यावेळी शरद पवारांच्या हाती सत्ता होती, तरीही बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि पवारांना विचारला आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत आम्ही सुडाचे राजकारण करत असल्याचे आमच्यावर आरोप केले जात आहेत. पण सुडाचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करीत नाही. तेव्हा दोन आठवडे राज्यातील जनतेला छळलं. बाबरी मशीद पडली अयोध्येत, पण दंगल घडली मुंबईत. बॉम्बस्फोट झाले मुंबईत. त्यावेळी सुधाकर नाईक – शरद पवार यांचेच सरकार होते. त्यावेळी शिवसेनेनेच हिंदूंना वाचवले. सरकारने ‘सामना’चा जुना अग्रलेख शोधून काढला आणि शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना आज अटक होणार, उद्या अटक होणार अशा अफवा पसरवून सर्वसामान्यांचे हाल केले. विद्यार्थांना शाळा-कॉलेज सोडावी लागली. शेवटी बाळासाबे स्वतः कोर्टात हजर झाले आणि कोर्टाने सांगितले की ही केसच होऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही गप्प का होतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.


मला परवा संजय राऊत यांनी विचारलं की तुमचं टार्गेट शरद पवारच असणार आहेत का? त्यावर मी दिलेलं उत्तर सांगतो की जोपर्यंत त्यांचं टार्गेट आपण आहोत तोपर्यंत माझं टार्गेट तेच असणार आहेत. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. इतकंच नाही तर जे शस्त्र शिवसेनेला विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेवर उगारलं तेच शस्त्र त्यांच्यावर उलटलं. हे सगळे हिशोब असेच होत असतात. शिवसेना संपवण्याची भाषा सगळ्यांनी केली मात्र ते जमलं कुणालाही नाही. उलट शिवसेनेची ताकद वाढली आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. ते पाणी पाहून मला मगरीचे अश्रूच आठवले. तुम्ही शेती करणार म्हणालात, पाणी हवं असेल आणि पाणी संपल्यावर धरणापाशी गेलात आणि धरणात पाणी नसेल तर काय करणार? अजित पवार तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे तुमच्या कर्माने आलेलं आहे. तुमच्याकडे जेव्हा माझा शेतकरी पाणी मागायला आला तेव्हा तुम्ही त्याला उदाहरण काय दिलं? आठवा. काय बोलला होतात ते विसरु नका.” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.