राष्ट्रवादीचे चिंतन; भाजपबरोबर कोणत्याही परिस्थितीत जाणार नसल्याचा पवारांचा निर्वाळा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल लक्षात घेता भाजपला रोखण्याकरिता काँग्रेसबरोबर आघाडी करावी, असा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतप्रवाह असला तरी काँग्रेसची एकूण भूमिका, राजकीय परिस्थिती हे सारे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे.

महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. या पाश्र्वभूमीवर नेतेमंडळींशी पक्षाध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस संवाद साधणार आहेत. पहिल्या दिवशी नेत्यांबरोबर  बैठकीत भविष्यातील वाटचाल कशी असावी, यावर विचारविनिमय करण्यात आला. बाहेर  चर्चा असली तरी भाजपबरोबर अजिबात समझोता केला जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडी तोडली होती. पुन्हा काँग्रेसबरोबर हातमिळवणी करावी का, यावर खल करण्यात आला. भाजपचा प्रभाव का वाढत आहे, यावरही चर्चा करण्यात आली. उद्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत पक्ष वाढीबाबत आढावा घेण्यात येईल. आघाडी सरकारच्या अखेरच्या काळात काँग्रेसने वाईट पद्धतीने वागणूक दिली. तसेच काँग्रेस नेते ऐनवेळी भूमिका बदलतात, असे काही नेत्यांनी निदर्शनास आणून दिले.

जिल्हा परिषदांसाठी दोन्ही काँग्रेस एकत्र

जिल्हा परिषदांमध्ये सत्ता संपादनाकरिता दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. पण उस्मानाबाद आणि रायगड या दोन जिल्ह्य़ांबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते अनुक्रमे राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे, जयंत पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत रात्री झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे मान्य केले. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास १२ ते १५ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.