१२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार; बँकांनी कर्जखात्यांची संख्या २० लाखांनी घटवली

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीस दिवाळीपासूनच सुरुवात करण्यात येणार असून, सुमारे १२ लाख शेतकऱ्यांना धनत्रयोदशीला ‘लक्ष्मीदर्शन’ योग घडावा यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल. याची घोषणा १६ किंवा १७ ऑक्टोबरला करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वीडन दौऱ्यावरून आल्यावर त्याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांचे अर्ज आणि बँकांकडून आलेल्या माहितीची छाननी प्रक्रिया अहोरात्र वेगाने सुरू आहे. बँकांनी आता कर्जखात्यांची संख्या ८९ लाखांवरून २० लाखांनी कमी असल्याचे दाखविले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या फुगविलेल्या आकडय़ांचा फुगाही कर्जमाफीच्या निमित्ताने फुटणार आहे.

कर्जमाफीची घोषणा करून काही महिने उलटल्यानंतर सरकारने दिवाळीचा वायदा केला होता. त्यामुळे आता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची रक्कम देण्यास सुरुवात करण्याची तयारी झाली असून ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे आणि त्यांना माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या छाननीतही हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे, त्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेची रक्कम जमा केली जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभाग, सहकार व अर्थखात्याचे उच्चपदस्थ अधिकारी यांची धावपळ सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून हमीपत्र घेऊन कर्जखात्यांची माहिती घेण्यात आली आहे, तर सहकारी बँकांच्या कर्जखात्यांची तपासणी करण्यासाठी सुमारे साडेतीन हजार लेखापरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. हे कामही वेगाने सुरू असून कर्जमाफीसाठी दिवाळीचा वायदा पूर्ण करण्यासाठी कर्जमाफीसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अर्थ विभागानेही आरटीजीएस प्रणालीद्वारे ही रक्कम बँकांकडे पाठविण्यासाठी तयारी केली असून पुरेसा निधी उपलब्ध आहे. पुढील तीन-चार दिवसांत छाननी प्रक्रियेची प्रगती पाहून मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेतील, असे संबंधितांनी स्पष्ट केले. दिवाळीनिमित्ताने बँकांना गुरुवार व शुक्रवारी सुट्टी आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या निधीची रक्कम मंगळवारी व बुधवारी बँक खात्यात जमा करावी लागेल. पहिल्या टप्प्यात किमान १०-१२ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा केल्यावर शिवसेनेसह विरोधकांची तोंडे बंद करता येतील. शेतकऱ्यांची संख्या छाननी प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, त्यावर अवलंबून राहील आणि पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम अदा केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

माहिती व तंत्रज्ञान विभागामुळेही गोंधळ?

कर्जमाफीसाठी ५६ लाख ५९ हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज आले आणि बँक कर्ज खात्यांची संख्या ७७ लाख २८ हजार इतकी असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी होती. मात्र सहकार खात्याने तपासणी केली असता गावातील कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या कर्जखात्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले. पती-पत्नी या दोघांचीही माहिती असल्याने हा आकडा काही ठिकाणी चुकला आहे. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ७७ लाख २८ हजाराहून खूप कमी होईल, असे सहकार विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

कर्जखात्यांच्या संख्येचे गौडबंगाल

राज्यातील बँकर्सनी (एसएलबीसी) सुमारे ८९ लाख शेतकरी बँक खात्यांचा आकडा सरकारला दिला होता. त्यामध्ये ४५ लाख राष्ट्रीयीकृत, तर ४४ लाख सहकारी बँकांमध्ये असल्याचे दाखविण्यात आले होते. पण सरकारने शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारल्याने बोगस बँक खात्यांचा छडा लागणार असल्याने बँकांचे धाबे दणाणले आहे. आता राष्ट्रीयीकृत बँकांनी ३३ लाख कर्जखात्यांचा दावा केला असून सहकारी बँक खात्यांची संख्या ३६ लाख दाखविण्यात आली आहे. म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकांनी १२ लाखांनी, तर सहकारी व व्यापारी बँकांनी आठ लाखांनी बँक खात्यांची संख्या कमी दाखविली आहे.