राज्याच्या सर्वच सरकारी क्षेत्रांना आर्थिक बेशिस्त आणि ढिसाळ कारभाराने ग्रासले असल्याचा भारताचे नियंत्रक आणि महालेखापालांनी (कॅग) ठेवलेला ठपका आणि सरकारने मांडलेल्या श्वेतपत्रिकेतही निराशाजनक चित्र अशी राज्याची वर्तमान स्थिती उघड झाली आहे. या परिस्थितीचे खापर आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आtop02घाडी सरकारवर फोडण्यात आले असले तरी बिघडलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर उपाय योजण्याचे आव्हान भाजप सरकारला पेलावे लागणार आहे.
महसूली जमा, खर्च, कर्ज, व्याज, भांडवली खर्च या साऱ्याच निकषांवर महाराष्ट्र सरकार साफ अपयशी ठरल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे. वित्त विभागाच्या श्वेतपत्रिकेत आधीच्या सरकारवर खापर फोडण्यात आले. सार्वजनिक बांधकाम, वित्त, नगरविकास या खात्यांमधील गैरकारभारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या खात्यांत योग्य कारभार झाला नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. फक्त राष्ट्रवादीला लक्ष्य न करता काँग्रेसही बदनाम होईल अशी खेळी केली गेली.