21 April 2019

News Flash

अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार; वनमंत्रालयाकडून स्वतंत्र समिती स्थापन

ही समिती T1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल

राज्याच्या वन खात्याकडून अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर राज्यासह देशभरात मोठा गदारोळ माजला होता. प्राणीप्रेमींसह अनेक राजकीय पक्षांनी यावरुन सरकारवर टीकेचा भडिमार केला. या टीकेला उत्तर देताना सरकाची अक्षरशः दमछाक होत होती. त्यामुळे अखेर या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय वन मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापण्याची घोषणाही शुक्रवारी करण्यात आली.

T1 वाघीणीच्या मृत्यू प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे या समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती T1 वाघीण मृत्यू प्रकरणात मार्गदर्शक तत्व तसेच स्थायी कार्यप्रणाली योग्य पद्धतीने अवलंबिली गेली किंवा नाही याबाबत वस्तुस्थिती दर्शक चौकशी करून शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, ठार करण्यात आलेल्या नरभक्षक अवनी वाघिणीचा शवविच्छेदन अहवाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. मात्र, या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे अवनी आठवडाभर उपाशी होती. दरम्यान, तिच्या दोन बछड्यांचा सध्या वनखात्याचे कर्मचारी अद्यापही शोध घेत आहेत. मात्र, त्यांचाही कदाचित भुकेने मृत्यू झाला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नरभक्षक झालेल्या या T1 वाघिणीला २ नोव्हेंबर रोजी यवतमाळच्या पांढरकवडा भागात बंदुकीची गोळी घालून ठार करण्यात आले होते. त्यानंतर सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. प्राणिमित्र, केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अवनी वाघिणीला ठार करण्यावर नाराजी व्यक्त करीत सरकारवर निशाणा साधला होता. यवतमाळमधील अनिल अंबानी यांचा प्रस्तावित प्रकल्प वाचवण्यासाठी या वाघिणीला ठार करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज यांनी केला होता. मात्र, याला उत्तर देताना अनिल अंबानींच्या प्रवक्त्याने सांगितले की, अंबानींचा कोणताही प्रकल्प यवतमाळ येथे नाही.

First Published on November 9, 2018 9:34 pm

Web Title: maharashtra forest ministry has formed an inquiry committee to look into the killing of tigress avni