‘महाराष्ट्र गाथा’ वेबव्याख्यानमालेस आजपासून आरंभ

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून ‘लोकसत्ता’च्या वतीने, राज्याच्या विविध क्षेत्रांचा साक्षेपी आढावा घेणारी ‘महाराष्ट्र गाथा’ ही वेब व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आज, सोमवारपासून दोन आठवडे चालणाऱ्या या विचार वैभवाचा पहिला भाग ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. प्रदीप आपटे यांच्या व्याख्यानाद्वारे अनुभवता येणार आहे.

देशाच्या अन्य  सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र अनेक क्षेत्रांत उजवा असल्याचे सिद्ध झाले. गेल्या सहा दशकांत या राज्याने अनेक बाबतीत आघाडी घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे फलित ठसठशीतपणे पुढे आले. उद्योगस्नेही राज्य म्हणून या राज्याने आपली ओळख दृढ के ली आणि वैचारिक क्षेत्रातील तर्क वादाने अन्यांना त्याची दखल घेणे भाग पडले. हे विविधांगी वेगळेपण या व्याख्यानांतून समोर येणार आहे. सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल.

महाराष्ट्राचा आर्थिक इतिहास, संत परंपरा, राज्यातील राजकीय नेतृत्त्वाचा उहापोह, महाराष्ट्राचा तर्कवाद, सुगम संगीत आणि काव्य परंपरा आदी अनेक विषयांवर या व्याख्यानमालेतून चर्चा घडणार आहे. विद्यार्थी, अभ्यासक, विचारवंत आणि ज्ञानसंग्रहकांसाठी ही मोठी मेजवानी ठरेल.

पहिल्या दिवशी…

संपत्ती निर्मिती करणारे एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. या राज्याचा आर्थिक इतिहास म्हणूनच नुसता कौतुकास्पद नाही, तर अनुकरणीयही आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक प्रा. प्रदीप आपटे कार्यक्रमाच्या पहिल्या पुष्पात ‘महाराष्ट्राचा आर्थिक विकास’ या विषयावर बोलतील.

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि  मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग सर्व्हिसेस, पुणे</p>