टाळेबंदीमुळे शहरांत अडकलेल्या नागरिकांना गावी जाण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : टाळेबंदीमुळे गेल्या ४० दिवसांपासून राज्यात आणि राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. परराज्यातील नागरिकांबरोबरच राज्यातील महानगरांत अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी जाण्याची सशर्त परवानगी सरकारने दिली. यामुळे टाळेबंदी लागू झाल्यापासूनच गावची ओढ लागलेल्या हजारोंचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Anti Gundam Squad beaten Goon
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या

सरकारने या स्थलांतराबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे. सर्व जिल्हाधिकारी या प्रक्रियेचे प्रमुख (नोडल अधिकारी) असतील. या संपूर्ण प्रक्रियेवर मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे देखरेख ठेवण्यात येईल. याबाबत सर्व यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने अंमलबजावणी करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

टाळेबंदीमुळे राज्यात विविध ठिकाणी परराज्यांतील श्रमिक, नागरिक असे  ५ लाख ४४ हजार लोक अडकले आहेत. तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या महानगरांतील नागरिकही आपापल्या गावी परतण्यास इच्छुक आहेत. राज्य सरकारांच्या आग्रहानंतर के ंद्राने परराज्यांतील मजुरांच्या स्थलांतरास परवानगी दिली. त्यानुसार राज्य सरकारने परराज्यात जाणाऱ्या आणि तेथून महाराष्ट्रात परतणाऱ्या तसेच राज्यातही विविध ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना स्थलांतराची परवानगी देत मोठा दिलासा दिला.

या प्रक्रियेची जबाबदारी मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, तसेच आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परराज्यातील लोकांच्या प्रवासासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवतील. राज्यातील लोकांना आपल्या घरी जाण्यासाठी स्वत: प्रवासाची व्यवस्था करावी लागेल. अन्य राज्यांनाही आपल्या नागरिकांना नेण्याची व्यवस्था करावी लागेल.

ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांचे पालन त्या व्यक्तीला बंधनकारक असेल. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडेही संमतिपत्रे असणे आवश्यक आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ‘ट्रान्झिट पास’ असणे व त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती बंधनकारक असून, यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधीही नमूद करावा लागणार आहे. वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावीत तसेच वाहनातही सामाजिक अंतर पाळावे लागणार आहे. इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस अलगीकरणात राहावे लागेल. याची दक्षता जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्यावर असेल. सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीस घरीच किंवा संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येईल. तसेच त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल.

जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी

प्रत्येक जिल्ह्य़ात अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून त्यांना त्यांच्या जिल्ह्य़ांत पाठविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्य़ातील लोकांची यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवतील. जिल्हाधिकारी किंवा आपत्ती व्यवस्थापन संचालक यांच्या पत्राशिवाय कोणालाही स्थलांतराची परवानगी दिली जाणार नाही. करोनाची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. याबाबत राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे असून ontrolroom@maharashtra.gov.in हा ईमेल आहे.

सोमवारपासून काही ठिकाणी टाळेबंदी शिथिल : पवार 

मुंबई : राज्यात ३ मेनंतर मुंबई, पुणे वगळून इतर काही ठिकाणी टाळेबंदी शिथिल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांनी गर्दी करू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले.