माळशेज घाट अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळाने तीन लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमी असलेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सगळा खर्च एसटी प्रशासनच करणार असल्याची घोषणा महामंडळाने केली. हा अपघात दुर्दैवी असून यापुढे असे अपघात कसे टाळता येतील, यावर महामंडळ लक्ष केंद्रित करणार आहे. मात्र प्रथमदर्शनी घडल्या प्रकारात चालकाची काहीच चूक दिसत नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ठाण्याच्या खोपट येथील आगारातून निघालेली ठाणे-नगर ही बस सकाळी साडेनऊच्या सुमारास माळशेज घाटातील शिव मंदिराजवळ पोहोचली. या वेळी समोरून भरधाव वेगात घाट उतरणाऱ्या एका ट्रकची धडक एसटीला लागून एसटी बाजूच्या दरीत २०० ते २५० फूट खाली कोसळली. एसटीचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची चर्चा होती. मात्र हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाला नसून ट्रकने दिलेल्या धडकेमुळेच झाल्याचे एसटीचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.
एसटीसाठी नवीन वर्षांत हा खूप मोठा झटका आहे. एसटीची ‘विनाअपघात सुरक्षितता मोहीम’ शुक्रवारपासून सुरू होणार आहे. मात्र त्याच्या आदल्या दिवशीच एवढा मोठा अपघात होणे हे खरोखर दुर्दैवी आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांच्या कुटुंबीयांना एसटी तातडीने तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च महामंडळातर्फे करण्यात येईल.

बस वेळेवर सुटली असती तर..
ठाण्याहून नगरकडे रवाना झालेली ही बस सकाळी ५.४५ वाजता निघणे अपेक्षित होते. मात्र ही बस तब्बल पाऊण तास उशिराने सुटून ठाण्याहून सकाळी ६.३० वाजता रवाना झाली. ही बस वेळेत सुटली असती तर अपघाताच्या वेळी ही बस अपघात स्थळापासून कित्येक किलोमीटर पुढे गेली असती, मात्र ‘विधिलिखित टाळता येत नाही’, याचा प्रत्यय या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला.