अंधश्रद्धा निर्मूलन याऐवजी जादूटोणाविरोधी कायदा, असे नामकरण करण्यात आलेल्या कायद्यातील अनेक वादग्रस्त तरतुदी वगळून हा कायदा एकदम सौम्य करण्यात आला. या कायद्यात सुरुवातीला २७ तरतुदी होत्या, नंतर त्या १३ करण्यात आल्या. त्यावरही आक्षेप घेण्यात आल्याने आता फक्त ११ तरतुदींचा कायद्यात समावेश आहे. या कायद्याचा भंग केल्यास सहा महिने ते सात वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करावा म्हणून जुलै १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात विधान परिषदेत पी. जी. दस्तूरकर यांनी मांडलेले अशासकीय विधेयक २६ विरुद्ध सात मतांनी मंजूर झाले होते. पण कायदा करण्याचे आश्वासन देऊनही युती सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर १६ डिसेंबर २००५ मध्ये हिवाळी अधिवेशनात विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले. पण विधान परिषदेत विरोधकांनी हे विधेयक अडविले आणि नंतर त्याला मुहूर्त मिळालाच नाही.
सुरुवातीला हे विधेयक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असे नाव ठेवण्यात आले होते. यातील अंधश्रद्धा या शब्दाला आक्षेप घेण्यात आल्यावर त्याचे ‘अंधविश्वास आणि अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून.. असे ९६ शब्दांचे लांबलचक नामकरण करण्यात आले होते. २७ तरतुदी कमी करून पुढे १३ तरतुदी करण्यात आल्या. यातील काही तरतुदींना आक्षेप घेण्यात येत होता. आणखी वाद नको म्हणून हा कायदा मठ, आश्रम आणि देवस्थानांना लागू करणे किंवा धार्मिक विधी या दोन तरतुदी शासनाने वगळल्या. यामुळे नव्या मसुद्यात फक्त ११च तरतुदी आहेत. मूळ मसुद्यातील महत्त्वाच्या बहुतांशी तरतुदी वगळून हे विधेयक खूपच सौम्य करण्यात आले आहे.

‘सरकार चर्चेस खुले’
जादूटोणाविरोधी कायद्याचा वटहुकूम काढण्यास विरोधकांनी विरोध केला आहे. काही सामाजिक संघटनांचा विरोध आहे. वटहुकूम काढला तरी हिवाळी अधिवेशनात या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर करताना काही सूचना असल्यास त्याचा जरूर विचार केला जाईल, असे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी स्पष्ट केले. सरकारची अजूनही चर्चेची तयारी असून, कायद्याला मूर्त स्वरूप देताना या काही सूचनांचा त्यात समावेश केला जाईल, असेही मोघे यांनी सांगितले.

या गोष्टींना प्रतिबंध
*  भूत उतरविण्याच्या नावाखाली एखाद्याला दोराने, साखळीने बांधणे, शरीरावर चटके देणे, जबरदस्तीने विष्टा भरविणे, उघडय़ावर लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडण़े
*  तथाकथित चमत्काराचा प्रसार किंवा प्रचार करून आर्थिक लाभ घेण़े
*  अघोरी प्रथा करणे किंवा अघोरी प्रथांचा अवलंब करण़े
*  मौल्यवान वस्तू, गुप्त धन आदींचा शोध घेण्याच्या बहाण्याने करणी, भानामती किंवा अनिष्ठ प्रथा करून जादूटोणा करणे.
*  आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून किंवा दैवी शक्ती संचारते, असे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे.
*  एखादी व्यक्ती करणी, जादूटोणा करते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे भासवून त्याच्याबद्दल संशय व्यक्त करणे किंवा एखादी व्यक्ती रोगराई पसरवते वा अपशकूनी असल्याचा प्रसार करून त्याचे जिणे हराम करणे.
*  चेटूक असल्याच्या नावाखाली एखाद्याची धिंड काढण़े
*  मंत्राच्या साहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करीन अशी धमकी देणे, मंत्रतंत्राच्या माध्यमातून विषबाधा उतरवितो, असे सांगणे
*  एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा झाल्यास वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे, दैवी किंवा भूताचा कोप असल्याचा आभास निर्माण करणे, अनिष्ट आणि अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणे.