कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याचा निर्णय गुरूवारी राज्य सरकारने घेतला. पानसरे यांची हत्या होऊन दोन महिने उलटले तरी पोलीसांना या हत्येचा माग काढता आला नव्हता. त्यामुळेच सरकारने अखेर याप्रकरणाच्या एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पर महासंचालक संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापन करण्यात आली असून या पथकात पुणे, मुंबई, कोल्हापूर या तीन ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. येत्या बुधवारी कोल्हापूरात एसआयटीची पहिली बैठक होणार आहे. यापूर्वी पानसरे यांची मुलगी स्मिता आणि सून मेघा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप अर्जाद्वारे हत्येचा तपास विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी)करण्याची मागणी केली होती.