महिलांवरील अत्याचार आणि त्यांचे प्रश्न याबाबत गंभीर नसलेले सरकार महिला आयोगाला अध्यक्षही द्यायला तयार नसल्याने राज्यातील प्रमुख महिला संघटनांनी एकत्र येऊन ‘राज्य महिला लोकआयोग’ हा प्रति आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ३०हून अधिक महिला संघटनांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व महिला संघटनांचं समान व्यासपीठ म्हणून आणि अत्याचारपीडित महिलांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी हा महिला लोकआयोग काम करणार आहे.
महिलांची असुरक्षितता, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा स्त्रियांचा प्रश्न, स्त्री भृण हत्या, कौटुंबिक अत्याचार या स्त्री प्रश्नांवर राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आले. त्या करिता ३० नोव्हेंबर मुंबईत राज्यव्यापी परिषद घेतली जाणार आहे. स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात रान पेटवणाऱ्या अ‍ॅड. वर्षां देशपांडे, जळगाव वासनाकांड उघडकीला आणून महिलांची चळवळ उभी करणाऱ्या वासंती दिघे, राज्यातील आदिवासी आणि शेतकरी महिलांचा आवाज असलेल्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन होणार आहे. लोकभारतीचे कपिल पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली.
स्त्री उद्योगिनी चळवळीच्या साईली ढमढेरे, अंजुमन इस्लामच्या रेहाना उड्रे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर, घर कामगार महिलांच्या नेत्या मधु बिरमोळे, यवतमाळच्या महिला बचत गट चळवळीच्या नेत्या प्रा. वर्षां निकम, मराठवाडय़ाच्या प्रा. अरुंधती पाटील, वसईच्या कॅथलिक बँकेच्या संचालक डॉमनिका डाबरे, मुंबईतील आरोग्य क्षेत्रातील महिलांचे संघटन करणाऱ्या रचना अग्रवाल, मुंबई लोक भारतीच्या यामिनी पंचाल, निलिमा ठाकूर, वर्षां विद्या विलास, विदर्भच्या माधुरी झाडे, रेहाना बेलीफ आणि रंजना दाते, कोकणातील शामल कदम, शिक्षक भारतीच्या संगीता पाटील, कल्पना शेंडे, अंजना प्रकाश यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज महिला या बैठकील उपस्थित होत्या.अधिक महितीसाठी संपर्क – वर्षां देशपांडे – ९८२२०७२०५६, प्रतिभा शिंदे – ९४०४५५९५१०, राजा कांदळकर – ९९८७१२१३००