ओडिशाला १९९९मध्ये चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात सुमारे साडेनऊ हजार लोकांचा बळी गेला होता. गावेच्या गावे भुईसपाट झाली होती. लाखो लोक विस्थापित झाले होते. त्या भयानक परिस्थितीत ओडिशाच्या मदतीला महाराष्ट्र धावला होता. महाराष्ट्र सरकारने ४५ कोटी रुपये खर्च करून एका जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर शाळा, महाविद्यालये, बहुउद्देशीय चक्रीवादळरोधक निवारे बांधले. १४ वर्षांनंतर पुन्हा चक्रीवादळाशी झुंज देणाऱ्या ओडिशाच्या किनारपट्टीवरील हजारोंना महाराष्ट्र सरकारने बांधलेल्या निवाऱ्यांमध्ये सुरक्षित आसरा मिळाला.
ऑक्टोबर १९९९ला चक्रीवादळाने ओडिशाला झोडपून काढले होते. त्यावेळी देशभरातून वादळग्रस्तांच्या मदतीसाठी लोक धावले. महाराष्ट्र सरकारनेही अन्नधान्य, औषधे, कपडे, बियाणे आदींची मदत पुरवली. त्महाराष्ट्र सरकार तेवढय़ावरच थांबले नाही. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगतसिंगपूरमधील काही गावांमध्ये पुनर्वसनाची कामे हाती घेण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राज्याच्या जनतेने, कर्मचाऱ्यांनी, उद्योजकांनी मोठय़ा प्रमाणावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत दिली. त्यातून ओडिशामध्ये पुनर्वसनाची अनेक कामे हाती घेण्यात आली. त्यावेळी ज्येष्ठ आयएएस अधिकारी उमेशचंद्र सरंगी आणि आयपीएस अधिकारी अरुप पटनाईक यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविली गेली होती.
तीन हजार लोकांना आश्रय
१५ दिवसांतच वरिष्ठ अधिकारी, अभियंते, डॉक्टर यांचा समावेश असलेले महाराष्टाचे सुमारे ३० जणांचे पथक जगतसिंगपूरला रवाना झाले. तीन वर्षे खपून राज्य सरकारने जगतसिंगपूरमधील १० गावांमध्ये शाळा-महाविद्यालयांच्या इमारतींची दुरुस्ती केली. सुमारे ७०० चक्रीवादळरोधक निवारे बांधले. त्यात वर्ग खोल्या, प्रयोग शाळा, स्वच्छतागृहे, मोठे व्हरांडे आदींचा समावेश होता. एका वेळी १५०० ते ३००० लोकांना आसरा मिळेल, या क्षमतेचे हे निवारे बांधण्यात आले. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पाच्या संचालक व सचिव श्रीमती आय.ए. कुंदन यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी अधिकाऱ्यांचे एक पथक ओडिशाला रवाना होणार आहे.
पायलिन चक्रीवादळाचा फटका जगतसिंगपूर जिल्ह्य़ांतील किनारपट्टीच्या गावांना बसला. परंतु महाराष्ट्र सरकारने बांधलेल्या निवाऱ्यांमध्ये आधीच हजारो लोकांनी आसरा घेतला होता. त्या भागातील शिक्षक, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी दूरध्वनी करून महाराष्ट्र सरकारला धन्यवाद दिले.
– सी. एस. मोहंती, तत्कालीन शिबीरप्रमुख