उत्तराखंडमध्ये हरीश रावत सरकारला विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्याआधीच राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपची एकपक्षीय राजवटीची आस आणीबाणी व हुकूमशाहीपेक्षा भयंकर ठरेल, अशी टीका सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली आहे. याशिवाय, महाराष्ट्रात केवळ राजकीय तडजोड म्हणून शिवसेना भाजबरोबर असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात सध्याची राज्यव्यवस्था ही एका मजबुरीतून निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अस्थिरता व राजकीय अराजकता निर्माण होऊ नये म्हणून शिवसेना सध्या सरकारसोबत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. महाराष्ट्रातील नैतिकता किंवा अनैतिकतेचा प्रश्‍न नसून राजकीय सोयीतून निर्माण झालेली ही तात्पुरती व्यवस्था आहे. राजकारणात आज कुणीही साधुसंत राहिलेला नाही. उद्या राष्ट्रीय, महाराष्ट्रीयप्रश्‍नी शिवसेनेने स्वतंत्र भूमिका घेतलीच तर भाजप सोवळे नेसून नैतिकतेचे राजकारण नक्कीच करणार नाही, असे सांगत सेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे.
ऐंशीच्या दशकात काँग्रेसने राज्याराज्यांतील विरोधकांची सरकारे बळाचा वापर करून घालवली तेव्हा आजचा भाजप त्या प्रवृत्तीच्या विरोधात स्वत:चीच मनगटे चावीत होता व काँग्रेसच्या हुकूमशाही वृत्तीवर टीकेची झोड उठवीत होता. पण नेमक्या याच बाबतीत भाजपने स्वत:चे काँग्रेजीकरण करून घेतले तर देशात अस्थिरता व अराजक माजायला वेळ लागणार नाही. उत्तराखंडातील राज्य कायद्याने व नियमाने चालवणे कठीण झाल्यानेच ते बरखास्त केले म्हणजे नेमके काय झाले? महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला नसता तर सरकार स्थापनेसाठी लागणार्‍या आकड्यांचा खेळ भाजपने कसा केला असता, असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.