शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी एकाच दिवशी स्पर्धा परीक्षा

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांतील तसेच निमशासकीय कार्यालयांतील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गट ब (अराजपत्रित) आणि गट क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी राज्यात एकाच दिवशी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन करण्याचे सर्व विभागांना सांगण्यात आले आहे. शासकीय-निमशासकीय सेवेतील ही मोठी भरती होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समित्यांच्या समन्वयातून एकाच दिवशी परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लोकसत्ताला दिली.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रिक्त जागा असल्याने, सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर त्याचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे या जागा भराव्यात अशी कर्मचारी व अधिकारी संघटनांची मागणी आहे. त्याची दखल घेऊन गेल्या मार्च-एप्रिलमध्ये पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या सेवेतील एकूण रिक्त जागांपैकी ७२ हजार पदे भरण्याची घोषणा केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी पूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळे स्थापन करण्यात आली होती. आता या मंडळांच्या कक्षेतील ही पदे भरण्यासाठी  जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, प्रादेशिक स्तरावर प्रादेशिक विभागप्रमुख आणि राज्यस्तरावर विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली निवड समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

राज्यात ३६ हजार रिक्त जागांपैकी निवड समित्यांमार्फत करण्यात येणाऱ्या गट ब व गट क संवर्गातील भरतीबाबत नियोजन करण्याच्या सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार डिसेंबर २०१९ अखेपर्यंत संभाव्य रिक्त पदांची परिगणना करून त्यानुसार १० जुलै २०१८ पर्यंत निवड समित्यांकडे मागणीपत्र सादर करायचे आहे. त्यानंतर निवड समित्यांनी मागणीपत्रांचे एकत्रिकरण करून ती १७ जुलै २०१८ पर्यंत माहिती व तंत्रज्ञान विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महापरीक्षा कक्षाकडे पाठवायची आहेत.

महापरीक्षा कक्षाने पदभरतीच्या परीक्षांचे आयोजन  करायचे आहे. प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार महापरीक्षा कक्षाला नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषद संवर्गातील भरतीसाठीची परीक्षाही एकाच दिवशी घेण्यात येणार असून, त्यादृष्टीने या विभागानेही नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या महानोकरभरतीची जाहिरात ३१ जुलैपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे ऑगस्टपासून भरती प्रक्रिया सुरु होईल. राज्यात एकाच दिवशी एवढय़ा मोठय़ा नोकरभरतीसाठी परीक्षा घेणे शक्य आहे का, असे विचारले असता जिल्हा निवड समित्यांच्या समन्वयातून त्याचे नियोजन केले जाईल, असे सीताराम कुंटे यांनी सांगितले.

काय होणार?

या पुढे राज्य शासनाचे सर्व विभाग, कार्यालये, तसेच शासनाच्या आधिपत्याखालील सार्वजनिक उपक्रमे, मंडळे, महामंडळे, संचालनालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकरभरतीच्या परीक्षा या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रामुख्याने कृषी व पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह, सार्वजनिक आरोग्य, मृद व जलसंधारण, जलसंपदा इत्यादी विभागांमधील ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. ऑगस्टमध्ये जिल्हा निवड समित्यांच्या समन्वयातून नियोजन करून एकाच दिवशी परीक्षा घेतली जाईल.