उद्योगांसाठी ५० टक्के तर शेती आणि पिण्यासाठी १७ टक्के दरवाढ

राज्यातील धरणांमधून शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने वाढ केली असून शेती-पिण्याचे पाणी १७ टक्क्यांनी तर उद्योगांचे पाणी ५० टक्क्य़ांनी महाग झाले आहे. बाटलीबंद पाणी, शीतपेये व बीअर उत्पादनासाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचा दर २५ पट वाढवत तो १६ रुपये प्रति एक हजार लिटरवरून थेट १२० रुपये करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे शेतीसाठी आता हेक्टरनिहाय सरसकट दर न आकारता मीटरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

सध्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१०-११ मध्ये निश्चित केलेल्या दरानुसार पाणी दिले जात होते. गेल्या सात वर्षांत महागाई निर्देशांकात ६३ टक्के वाढ झाली आहे. सिंचन व्यवस्थापनाचा खर्च वाढत असल्याने पाण्याच्या दरात वाढ करण्यात आली असून नवीन दर एक फेब्रुवारी २०१८ पासून लागू होतील. नव्या दरातून १०१६ कोटी रुपये महसूल मिळेल.

काही बदल..

ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. त्यांना प्रति माणशी प्रति दिन आता ४० ऐवजी ५५ लिटर पाणी मिळेल. क वर्ग, ब वर्ग, आणि अ वर्ग नगरपालिकांसाठी अनुक्रमे ७०, १०० व १२५ लिटर पाणी देण्यात येईल. ५० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांना १३५ लिटर तर त्याारील लोकसंख्येच्या  शहरांना १५० लिटर पाणी प्रति माणशी प्रति दिन मिळेल.घरगुती वापरासाठी महानगरपालिकांना २५ पैशांना हजार लिटर, नगरपालिकांना १८ पैसे व ग्रामपंचायतींना १५ पैशांना हजार लिटर पाणी मिळेल. त्याचबरोबर मर्यादेच्या ११५ ते १४० टक्के पाणी वापरल्यास दीडपट तर १४० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी उचलल्यास दुप्पट दर द्यावा लागेल. उद्योगांना चार रुपये ८० पैशांना हजार लीटर पाणी मिळेल. त्यांनी मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरल्यास दीडपट दर लागेल.

शेतीसाठी नवा दर..

शेतीसाठी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे प्रति एक हजार लिटरसाठी साडेचार पैसे, नऊ पैसे, साडेतेरा पैसे इतका दर असेल. पाणीवापर संस्थांना या दरात २५ टक्के सूट देण्यात आली असून सूक्ष्म सिंचनासाठी आणखी २५ टक्के प्रोत्साहनात्मक सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रति हेक्टरी पाण्याचा सरसकट दर यापुढे असणार नाही. तर शेतीसाठी मीटरनेच पाणीपुरवठा केला जाईल. यापुढे उपसा सिंचन योजनेवरील शेतकऱ्यांना पाणीपट्टी व फक्त १९ टक्के वीजबिल द्यावे लागेल.