एकनाथ खडसे यांचा घरचा अहेर

अल्पसंख्याक समाजाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा घरचा अहेर देत अल्पसंख्याक समाजाबाबत सरकारच्या मनात नेमके आहे तरी काय, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला केला.

अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांच्या चर्चेत सहभागी होताना एकनाथ खडसे बोलत होते. राज्य सरकार ओबीसी, अल्पसंख्याकांबाबत उदासीन असल्याची टीकाही खडसे यांनी केली. माझ्या मतदारसंघात तीन वर्षांपूर्वी अल्पसंख्याकांसाठी तंत्रनिकेतन करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी जागा दिली. निविदाही निघाली. मात्र निधी नसल्याने ते होऊ शकले नाही. निधीसाठी सगळीकडे फिरलो, मात्र निधी मिळाला नाही. सरकारची अल्पसंख्याक समाजाबाबतची भूमिका काय आहे हे यावरून दिसून आल्याचेही खडसे यांनी सुनावले.

जलयुक्त शिवार योजनेची कामे पहिल्या वर्षी ज्या प्रमाणात सुरू होती त्याच्या केवळ २५ टक्के कामे सुरू आहेत. योजनेला सध्या निधीही मिळत नाही. अनेक कामांत भ्रष्टाचार झाला आहे. मराठवाडय़ात याबाबत गुन्हेही दाखल आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून किती गावे दुष्काळमुक्त झाली, किती पैसा खर्च झाला, पाणी साठवण क्षमता किती वाढली, सिंचन किती वाढले, दुष्काळी भागातील पाणीपातळी किती वाढली ही सर्व माहिती सभागृहात द्यावी, अशी मागणी खडसे यांनी केली. ही योजना मुळात चांगली आहे. मात्र त्यात अटीच अधिक आल्याची टीका त्यांनी केली.