23 April 2019

News Flash

मुलींची सुरक्षितता आता शाळांच्या शिरावर!

मुलींसाठीची  स्वच्छतागृहे एकमेकांपासून पुरेशा अंतरावर असावीत, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

संग्रहित छायाचित्र)

सरकारचा विशेष निर्णय; आजपासून दिवसातून तीन वेळा हजेरी

मुंबई : मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येऊन सरकार व सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठू लागल्यामुळे आता शाळकरी मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा झटून कामाला लागल्या आहेत.

१८ वर्षांखालील मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास करण्याचा निर्णय होऊनही अनेक बेपत्ता मुलींचा शोधच लागला नसल्याने, शाळा, परिवार वा सार्वजनिक ठिकाणी मुले सुरक्षित राहावीत याकरिता विशेष ‘रक्षा अभियान’ हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंगळवारपासून राज्यात ही मोहीम सुरू करण्यात येणार असून प्रत्येक वर्गातील मुलांची तीन वेळा हजेरी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.

मुले शाळेच्या आवारात असेपर्यंत त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहील असे बजावण्यात आले असून कोणीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही सरकारने केली आहे. शाळेच्या बसमधून प्रवास करणारी शेवटची मुलगी घरी पोहोचेपर्यंत या बसमध्ये महिला सेविका किंवा शिक्षिका असावी, शाळा सुटल्यानंतर कोणीही विद्यार्थी शाळेच्या आवारात राहिला नसेल याची खातरजमा करावी, मुलगे आणि मुलींसाठीची  स्वच्छतागृहे एकमेकांपासून पुरेशा अंतरावर असावीत, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.  शाळेतील विद्यार्थ्यांवरील अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत तसेच राष्ट्रीय बालहक्क आयोगाने तयार केलेल्या सुविधेची माहिती पालकांना पोहोचविण्याकरिता राज्य बालहक्क आयोगाने तयार केलेल्या चिराग या मोबाइल अ‍ॅपची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन या अ‍ॅपचा वापर करण्यासंबंधी पालकांना मदत करावी, असेही शासनाने शाळांना बजावले आहे.

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्य़ाबाबत विशेष किशोर पोलीस पथकांस अथवा स्थानिक पोलीस ठाण्यास तातडीने खबर देणे शाळांवर बंधनकारक राहणार असून, बालकांच्या सुरक्षिततेसंबंधातील उपाययोजना आखताना पालकांच्या सूचना विचारात घेण्याकरिता शाळांमध्ये सूचना पेटय़ा लावणेही सक्तीचे करण्यात आले आहे.

होणार काय?

* या मोहिमेनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी खास यंत्रणा राबविण्याचे आदेश राज्याच्या बालहक्क आयोगाने जारी केले असून शाळांच्या प्रवेशद्वारांवर तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत.

* राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांना या आदेशाची अंमलबजावणी सक्तीची करण्यात येणार आहे.

* मुलांच्या सुरक्षिततेबाबत   हेळसांड होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांच्या ताफ्यात महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.

* शालेय विद्यार्थ्यांच्या, विशेषत: मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेआधी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना २५ सूचनांचा आदेशच जारी केला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आता बालहक्क आयोग जातीने राज्यात पाहणी करणार आहे.’

– प्रवीण घुगे, राज्याच्या बालहक्क आयोगाचे  अध्यक्ष

First Published on September 11, 2018 3:27 am

Web Title: maharashtra government issues safety norms for school