लॉकडाउनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईमधील लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी रेल्वेला पत्र पाठवण्यात आलं आहे. पत्रामध्ये राज्य सरकार करोनासंबंधित नियमांचं पालन करत लोकल सेवा पुन्हा एकदा सुरु करण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात आलं. लोकल सेवा कशा पद्धतीने सुरु करायची याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

पत्रामध्ये लोकल सेवा एकाच वेळी सुरु न करता टप्प्याटप्प्याने सुरु कऱण्याचा उल्लेख आहे. तसंच यासाठी ठराविक वेळाही निर्धारित करण्यात आल्या आहेत. यानुसार अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारी व्यक्ती सकाळी पहिल्या ७.३० ची पहिली लोकल, तसंच ११ ते ४.३० आणि रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करु शकते.

अत्यावश्यक सेवेतील प्रवासी ज्यांच्याकडे अधिकृत क्यूआर कोड आहे तसंच  ओळखपत्रासोबत अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणारे सकाळी ८ ते १०.३० तसंच संध्याकाळी ५ ते ७.३० च्या दरम्यान प्रवास करु शकतात. याशिवाय प्रत्येक एका तासाने महिला विशेष लोकल धावणार आहे.

 

ठाकरे सरकारने प्रवासाच्या वेळांचा प्रस्ताव मांडताना प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर या प्रस्तावावर उत्तर देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असं सांगत लोकल सेवा सुरु होण्याचे संकेत दिले होते. एका प्रवाशाने ट्विट करत, “याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे” अशी खंत व्यक्त केली.

यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी, “पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ” असं सांगितलं. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असंही ते म्हणाले आहेत.