डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश केल्यानंतर राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रात अंबरनाथ आणि पनवेल, अशा दोन नव्या महापालिका स्थापन करण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यासंबंधीचा एक प्रारूप आराखडा तयार केला असून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ व कुळगाव बदलापूर नगरपालिकांचे एकत्रीकरण आणि रायगड जिल्ह्यातील उलवे, नवीन पनवेल व खारघर या सिडको उपनगरांचा समावेश करून पनवेल महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
हे करीत असताना वसई-विरार, भिवंडी-निजामपूर या महापालिकांच्या तसेच अलिबाग व कर्जत नगरपालिकांच्या हद्दीत वाढ करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. या योजनेत मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका हद्दीचे विस्तारीकरण, रोजगाराचे विकेंद्रीकरण, पर्यावरण व्यवस्थापन तसेच भू-वापर आणि चटईक्षेत्र निर्देशांक किती असावा यासंबंधीचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी यापूर्वी आखलेल्या मोठय़ा प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
डोंबिवलीलगत असलेली २७ गावे आणि भिवंडीच्या वेशीवरील ६० गावांमध्ये नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना दोन महिन्यांपूर्वी यापैकी २७ गावांचा परिसर कल्याण-डोंबिवली महापालिकेस जोडण्यात आल्याने येथील नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्राधिकरणाकडून काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या नव्या प्रारूप योजनेत नव्या महापालिकांचा प्रस्ताव मांडताना भिवंडीसारख्या महापालिकेच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव आखण्यात आला आहे.
विस्तारीकरणाला वाव
वसई-विरार आणि भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या हद्दीत वाढ करण्याचाही प्रस्ताव आहे. मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या माणकोली, राजलोली पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर रिकामी जमीन असून या ठिकाणी ठोस नियोजन प्राधिकरण नसल्याने बेकायदा बांधकामांना पूर आला आहे. भिवंडी महापालिका हद्दीत या परिसराचा समावेश करून या सर्व क्षेत्रांचा विकास आराखडा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यात नेरुळ येथे ममदापूर व रीस-मोहपाडा या विभागात नवी नगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.

प्रस्ताव काय आहे?
* अंबरनाथ आणि कुळगांव-बदलापूर नगरपालिकांचे एकत्रीकरण करून नवी महापालिका निर्माण करावी.
* पनवेल नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करावे. तिच्या हद्दीत कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कामोठे अशा उपनगरांचा समावेश करावा. पनवेल महापालिकेत उलवे उपनगराचाही समावेश.
* खारघरचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करावा, यासाठी जनहित याचिका दाखल आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वेशीवरील खारघर  रायगड जिल्ह्यात मोडते. त्यामुळे सीमांकनाच्या तांत्रिक अडचणी निर्माण करून घेण्यापेक्षा हे उपनगर प्रस्तावित पनवेल महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.