राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी निर्णय घेतला.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्व शहरे व गावे हागणदारीमुक्त करून स्वच्छ करायची आहेत. वैयक्तिक, सार्वजनिक शौचालये बांधणे व घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान पुरेसे नाही. त्यामुळे इतर स्रोतांतून निधी उपलब्ध करण्याची गरज भासू लागली आहे. केंद्राने उद्योगांकडून मिळणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी (सीएसआर) स्वच्छ भारत कोष स्थापन केला आहे. निती आयोगाने नेमलेल्या अभ्यास गटाने राज्य स्तरावर अशा प्रकारे स्वतंत्र कोष स्थापन करण्याची शिफारस केली आहे. सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.