बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची अमली पदार्थ प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. कंगना रणौतकडून अमली पदार्थांचा वापर करण्यात आल्याचा आरोप असून याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांना अधिकृत पत्र पाठवलं असून तपास करण्याचा आदेश दिला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिवेशनादरम्यान ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचं सांगितलं होतं. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

मुंबई पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगण्यात आलं असून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तापस विशेष पथकाकडून करायचा की अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करायचा यासंबंधी अद्याप मुंबई पोलिसांनी निर्णय घेतलेला नाही.

आणखी वाचा- ड्रग प्रकरणी NCB ने कंगनाची स्वतःहून चौकशी करावी – सचिन सावंत

अनिल देशमुख यांनी काय म्हटलं होतं?
अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, “आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या विनंतीवर विधानसभेत उत्तर देताना मी सांगितलं की, कंगना राणौत आणि अध्ययन सुमन यांच्यात संबंध होते. अध्ययन सुमनने एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेत असून आपल्यावरही जबरदस्ती केली होती असं सांगितलं होतं. मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक माहिती घेत आहेत”.

आणखी वाचा- …तर कायमची मुंबई सोडून देईन, कंगनाचं गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान

कंगनाचं आव्हान
अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर टीका करताना कंगनाने ट्विट करत आव्हान दिलं होतं. “मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय,” असं ट्विट कंगनाने केलं होतं.