मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सरकारने कधीही कोणताही हस्तक्षेप केलेला नसून कोणावर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास गृह विभागाच्या परवानगीची गरज नाही. गजानन पाटील लाच प्रकरणातही सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नसून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याने अन्य कोणत्याही चौकशीची गरज नाही. गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांची पाटील याच्यावर पाळत असल्याने ते या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि दोषींवर कारवाई होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर कथित लाच प्रकणात आपल्यावर निराधार आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. अंबरनाथ येथील एका जागेसाठी महसूल विभागात राबता असणाऱ्या गजानन पाटील यांनी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याची तक्रार इंटरनॅशनल सोसायटी फार एक्सलन्स इन प्रोजेक्टस मॅनेजमेंट अ‍ॅन्ड रिसर्च या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. के.जाधव यांनी केल्यानंतर लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने गजानन पाटील याला मंत्रालय परिसरातून अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.