परदेशातील चित्रीकरणास स्थगिती

मुंबई : जगभरात हजारो बळी घेणाऱ्या ‘करोना’चा फटका मनोरंजनविश्वालाही बसला आहे. करोनाच्या धास्तीमुळे हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांच्या परदेशातील चित्रीकरणास स्थगिती देण्यात आली असून अनेक कलाकारांनी प्रसिद्धी आणि परदेश दौरेही रद्द केले आहेत.

जगभरात करोनाचा ७० देशांत फैलाव झाला आहे. याचा धसका मनोरंजनविश्वानेही घेतला असून परदेशातील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण लांबणीवर टाकण्यात आले आहे. इटलीमध्ये सुरू असलेल्या ‘मिशन इम्पॉसिबल ७’ या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. या चित्रपटात टॉम क्रूझ प्रमुख भूमिका करत असून सध्या व्हेनिस शहरात सुरू असलेले चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. याचबरोबर डिस्नेने ‘मुलान’ या चित्रपटाचे चीनमधील प्रदर्शन पुढे ढकलले आहे. थायलंडमध्ये नागार्जुनच्या ‘वाइल्ड डॉन’ या चित्रपटाचे चित्रीकरणही थांबवण्यात आले आहे.

भारतातही प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या चित्रपट निर्मात्यांनी सावधगिरी बाळगत प्रसिद्धी दौरे रद्द केले आहे. ‘बागी ३’ आणि ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटांच्या चमूनेही दिल्लीला प्रसिद्धी दौऱ्याला जाण्याचे टाळले. अभिनेत्री दीपिका पदुकोणने करोनाच्या धास्तीमुळे परदेश दौरा रद्द केला आहे. दीपिकाला पॅरिसमधील फॅशन वीकच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र पॅरिसमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्याचे निदर्शनास आल्याने तिने पॅरिस दौरा रद्द केला. अभिनेत्री शोभिता धूलीपाला हिने केरळमधील ‘सितारा’ या चित्रपटाचे चित्रीकरण रद्द केले आहे. ‘करोना’च्या भीतीमुळे नागरिकांनीही घराबाहेर पडणे बंद केले असून, याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होत असल्याने निर्मातेही चिंताग्रस्त आहेत.

मराठी कलाकारांची धुळवड रद्द

करोनाच्या धास्तीमुळे दरवर्षी मराठी कलाकारांची होणारी धुळवड रद्द केली आहे. अवधूत गुप्ते, श्रीरंग गोडबोले, अभिजित पानसे, जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, अमेय खोपकर या कलाकारांच्या ‘रंगकर्मी’ या ग्रुपतर्फे दर वर्षी शिवाजी पार्क आणि वांद्रे येथे धुळवड साजरी करण्यात येते. मात्र या वर्षी करोनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव धुळवड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल दिग्दर्शक निर्माते श्रीरंग गोडबोले यांना विचारले असता करोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. देशात सर्वाना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धुळवड खेळताना कलाकारांना याची लागण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

होळीचे स्वरूप मर्यादित ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात झालेला नाही. राज्यात एकही रुग्ण आढळलेला नसून नागरिकांनी भीती न बाळगता सतर्कता ठेवावी. लोकांनी मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

करोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने केलेल्या सज्जतेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जगात करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात यंत्रणा सतर्क झाली आहे. करोनाच्या चाचण्या करण्यासाठी मुंबई पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथेही सोय करण्यात आली आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी आवश्यक ते वाढीव डॉक्टर आणि कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान आल्यानंतर त्याची साफसफाई करताना कर्मचाऱ्यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, होळीच्या सणाचा आनंद घेताना त्याचे स्वरूप मर्यादीत ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. व्यास म्हणाले, ‘गेल्या दोन महिन्यात करोनाविषयी अभ्यास सुरू आहे. २० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांमध्ये त्याची लागण होण्याची शक्यता एक टक्का असते. २० ते ३० वर्षांतील नागरिकांना एक ते दोन टक्के, ५० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात लागण होण्याची शक्यता असते. ज्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली त्याला त्रास होत नाही.’

प्रवीण परदेशी म्हणाले, आतापर्यंत ७० हजार प्रवाशी  तपासले. विमानतळ, बंदरे प्राधिकरणाची बैठक घेतली. मुंबई विमानतळावर मुंबई महापालिकेते ५० डॉकटर्स तपासणीसाठी नियुक्त आहेत. बाधीत भागातून आलेल्या आणि लक्षणे आढळलेल्या नागरिकांची नोंद करण्यासाठी महापालिकेने कक्ष तयार केले आहे. त्यासाठी १९१६ क्रमांक दिला आहे. खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना देखील दोन दिवसांनंतर प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी मार्गदर्शन

मुंबई : पालिका शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी करोनाबाबत मार्गदर्शन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. करोना संसर्गाची लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे आदेश प्रशासनाने शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने करोना विषाणू संसर्गाबाबत प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशांचे पालन करीत पालिका प्रशासनाने आपल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, खासगी प्राथमिक अनुदानित व विना अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची सूचना केली आहे. या  संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.