कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करीत राज्य सरकारने मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या रात्र जीवनापाठोपाठ आता भाजपच्या मध्यरात्र बाजारपेठेलाही खीळ बसली आहे.
जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवणाऱ्या मुंबईचे आकर्षण असल्यामुळे विदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने येथे येतात. विदेशी पर्यटक, तसेच मुंबईकरांना रात्री १२ वाजेपर्यंत वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर मुंबईतील निवडक भागातील बाजारपेठा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुल्या ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अमित साटम यांनी २०१३ मध्ये एका ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबईत फेरीवाला क्षेत्राची आखणी करताना या समितीमार्फत रात्र बाजारपेठेबाबत धोरण करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून अलीकडेच स्पष्ट करण्यात आले होते. शिवसेनेच्या रात्र जीवनाची योजना बारगळली असताना भाजपची मध्यरात्रीपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याची योजना प्रशासनाच्या उत्तरामुळे साकार होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्यामुळे भाजप नगरसेवक खूश झाले होते.
मुंबईकरांची दगदगीची जीवनशैली लक्षात घेऊन त्यांना रात्री उशिरापर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी दुकाने मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापौरांनी १२ डिसेंबर २०१३ रोजी पत्र पाठवून राज्य सरकारकडे केली होती. या पत्राची दखल घेत राज्य सरकारने राज्यातील दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली. मात्र महिलांचा विनयभंग, छेडछाड, चोरी आदींमध्ये वाढ होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची, तसेच पोलिसांवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
तसेच पोलीस दलाकडूनही त्यास हरकत घेण्यात आली. त्यामुळे आता भाजपचे मध्यरात्रीपर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.

हाँगकाँगच्या धर्तीवर मुंबईतील निवडक भागातील बाजारपेठा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुल्या ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अमित साटम यांनी २०१३ मध्ये एका ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.