योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला सुमारे सहाशे एकर  जागा  कवडीमोल दराने दिली असून त्यामुळे राज्य सरकारचे ३५० ते ४०० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे, असा आरोप काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत आले. यावेळी त्यांनी पतांजलीला देण्यात आलेल्या जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया त्वरीत रद्द करण्यात यावी व संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

पतंजलीला दिलेली जमीन ही नागपूर विमानतळाजवळ मिहान SEZ येथील असून याची मूळ किंमत १ करोड प्रती एकर आहे परंतु पतंजलीला मात्र २५ लाख एकर किंमतीला देण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारचे सुमारे ३५० ते ४०० करोडचे आर्थिक नुकसान होणार आहे,  जमीन हस्तातरण प्रक्रिया संशयास्पद असून याध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केलेला आहे. फक्त दाखविण्यासाठी ई-टेंडरिंग केले गेले. दोन वेळा खोट्या निविदाही सादर केल्या गेल्या. राज्य सरकारने अगोदरच या जमिनीची सर्व माहिती आणि किंमत पतंजलीला दिलेली होती. पारदर्शकतेच्या गप्पा करणारी भाजपा सरकार मात्र या संपूर्ण प्रकरणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्याचीच बदली करते, हे सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे खूप मोठे षडयंत्र आहे, असा आरोप निरूपम यांनी केला.