31 May 2020

News Flash

मला खोटारडे ठरविल्यानेच चर्चेची दारे बंद – उद्धव ठाकरे

केंद्रीय मंत्रिमंडळात चांगले खाते देण्याचे आश्वासन देऊनही अवजड उद्योग हे खाते शिवसेनेला देण्यात आल्याचा आरोपही उद्धव यांनी केला.

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती; खोटे बोलणाऱ्यांशी संवाद नाही

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरून आपल्याला खोटारडे ठरविण्याचा प्रयत्न काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानेच आपण भाजपबरोबरची सरकार स्थापनेची चर्चा थांबविली होती. जनतेला उल्लू बनविणाऱ्या आणि खोटे बोलणाऱ्यांशी अजिबात चर्चा करायची नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला.

केंद्रीय मंत्रिमंडळात चांगले खाते देण्याचे आश्वासन देऊनही अवजड उद्योग हे खाते शिवसेनेला देण्यात आल्याचा आरोपही उद्धव यांनी केला. सरकार स्थापन न होण्याचे खापर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले होते. फडणवीस यांना लगेचच ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. सरकार स्थापण्याची चर्चा आपण थांबविली, असा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णयच झाला नव्हता, हा फडणवीस यांचा दावा म्हणजे शुद्ध खोटारडेपणा आहे, असे ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले. यातून फडणवीस यांनी मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. सत्तावाटपात उजवे-डावे करता आले असते, पण आपल्याला खोटे पाडण्यात आल्यानेच संवाद थांबविला होता, असे उद्धव म्हणाले.

युती संदर्भातील चर्चेचा तपशील आणि घटनाक्रमही उद्धव यांनी सांगितला. युतीची चर्चा सुरू झाल्यावर उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली असता, आपल्याला हा प्रस्ताव मान्य नव्हता. यातून युतीत चर्चारोध झाला होता. अमित शहा यांचा दूरध्वनी आला आणि त्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. सत्तेचे समान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद यावर आपण ठाम होतो. हा प्रस्ताव मान्य झाल्यानेच मी युतीला मान्यता दिली. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आताच जाहीर करू नका. अन्यथा आपली पक्षात अडचण होईल, अशी विनंती फडणवीस यांनी आपल्याला केली होती. यातून मार्ग काढण्याची जबाबदारी फडणवीस यांची होती. आता तेच असा प्रस्तावच नव्हता, असे सांगत मला खोटे पाडत आहेत. याचाच आपल्याला संताप असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाचा कोणताही निर्णय झाला नव्हता, हा फडणवीस यांचा दावा धक्कादायक होता. तेव्हाच आपण चर्चा थांबविण्याचा निर्णय घेतला. भाजपने प्रत्येक वेळी आश्वासन पाळलेले नाही. २०१४ मध्ये केंद्रात शिवसेनेला अवजड उद्योग हे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते देण्यात आले. २०१९च्या लोकसभा निकालानंतर चांगले खाते मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ते देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण पुन्हा अवजड उद्योग हेच खाते दिले गेले. यावरून भाजपची मित्र पक्षांबाबतची भूमिका दिसते, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

मोदींवर टीका करणारे दृष्यंत कसे चालतात ?

शिवसेनेतर्फे मोदींवर टीका केली जाते, असा आक्षेप फडणवीस यांनी घेतला. आम्ही धोरणांवर टीका केली होती, पण हरयाणात भाजपने उपमुख्यमंत्रीपद दिलेले दुष्यंत चौटाला यांनी मोदी-शहा यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. त्यांनी केलेले भाषणच त्यांनी पत्रकार परिषदेत ऐकवले. मोदींवर टीका करणारे साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांना चालतात. प्रचार सभांमध्ये मोदी यांनी माझा उल्लेख छोटा भाऊ असा केला होता. यातून कोणाच्या तरी पोटात दुखले असावे. त्यातूनच काही जणांनी कपट केले असेल, अशी शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली.

नाणार परत आणण्याचा घाट

युतीच्या चर्चेत कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. तशी घोषणाही झाली. पण नंतर पुन्हा त्याच ठिकाणी- नाणारमध्ये हा प्रकल्प उभा करण्याची भाषा फडणवीस यांनी सुरू केली. शिवसेनेला दिलेले आश्वासन न पाळण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता, असे उद्धव यांनी सांगितले.

रा. स्व. संघाने विचार करावा!

प्रभू राम हा सत्यवचनी होता. हिंदुत्व म्हणजे सच्चाई. पण भाजपमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा लागलेली दिसते. याचा रा. स्व. संघाने विचार करावा, असे ठाकरे म्हणाले. आमच्याशी चर्चा करताना खोटे बोलणार नाही, अशी शपथ भाजपला घ्यायला लावावी की काय, अशी परिस्थिती आहे, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 1:30 am

Web Title: maharashtra government shivsena uddhav thakre devendra fadnavis akp 94
Next Stories
1 दलाई लामा यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषद
2 घोडेबाजाराच्या भितीने काँग्रेस आमदारांची राजस्थानला रवानगी
3 राज्यपालांच्या भूमिकेकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे लक्ष
Just Now!
X