दोन महिन्यांची मुदत

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील तीन डान्सबारना मुंबई पोलिसानी परवानगी दिली असली तरी नव्या कायद्यातील अटींची येत्या ६० दिवसांत पूर्तता केल्याशिवाय बार सुरू करता येणार नाहीत अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे डान्सबार सुरू करण्याच्या तयारील असलेल्या बारमालकांना धक्का बसला असून नव्या नियमानुसार बार चालविणे अशक्य असल्याने काहींनी परवाने घेण्याचा नादही सोडून दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलासा दिल्यानंतही बार पुन्हा सुरू होण्याची आशा धुसर झाली आहे.

सरकारने काही दिवसांपूर्वीच ‘महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे, आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबताचा कायदा केला आहे. त्याबाबतची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. मात्र हा कायदा येण्यापूर्वी अर्ज केलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र दाद मागणाऱ्या अंधेरीमधील रत्ना पार्क, एरो पंजाब, दुर्गा प्रसाद, गुड्डी, साईप्रसाद, उमा पॅलेस मुलुंड, नटराज टिळकनगर आणि इंडियाना बार ताडदेव या आठ बारच्या मालकांना विशेष बाब म्हणून डान्सबारची परवानगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.