दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १ नोव्हेंबरपासून एसटीचा प्रवास मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी केली. लातूरमधील स्वाती पिटले या तरुणीने बसच्या पाससाठी २६० रुपये नाहीत म्हणून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वाती अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील ४ लाख ६० हजार या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत एसटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पासचा खर्च उचलणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ९ कोटी रूपये देण्यात येणार आहेत. नोव्हेंबर २०१५ ते मार्च २०१६ या काळात ही योजना राबविणयात येणार आहे.