मुखपट्टय़ा, सॅनिटायजरच्या दरांवर आता नियंत्रण!

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : करोनाविरोधातील लढय़ातील अत्यावश्यक घटक असलेल्या मुखपट्टय़ा (मास्क) आणि सॅनिटायजरच्या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या आधिपत्याखाली समितीची स्थापना केली आहे. ही समिती लवकरच मुखपट्टय़ा आणि सॅनिटायजरचे दर निश्चित करणार आहे.

एरवी दहा ते वीस रुपयांना मिळणाऱ्या एकेरी मुखपट्टीचे दर करोनाकाळात पन्नास ते दीडशे रुपयांपर्यंत पोहोचले. सॅनिटायजरच्या किमतीही मोठय़ा प्रमाणात वाढल्या. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने ‘टू प्लाय’ मुखपट्टी आठ रुपये व ‘थ्री प्लाय’ मुखपट्टीची किंमत दहा आणि १६ रुपये निश्चित केली होती. तसेच २०० मिली सॅनिटायजरसाठी १०० रुपयांपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असा आदेश २४ मार्च रोजी जारी केला होता. मात्र ३० जून रोजी केंद्राने या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक कायद्यातून वगळल्यानंतर बाजारातील या उत्पादनांच्या किमती पुन्हा वाढल्या.

याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यां सुचेता दलाल यांनी जनहित याचिका केली. यानंतर केंद्राने ‘पीपीई किट’ व ‘एन ९५’ मुखपट्टय़ांच्या नियंत्रणाबाबत पाऊल उचलले. तसेच राज्यांनाही दरनिश्चितीबाबत भूमिका घेऊन कारवाई करण्यास सांगितले.

समितीचे काम काय?

’ आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या आदेशानुसार मुखपट्टय़ा आणि सॅनिटायजरच्या किमती निश्चित करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

’ या समितीत हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त आणि आरोग्य संचालकांचा समावेश आहे.

’ ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करणार असून, यापुढे मुखपट्टय़ा आणि सॅनिटायजरचे दर कमी होऊन नियंत्रणात राहातील, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.