राज्यातील युती सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिवस सुशासनदिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. तर, गेल्या पंधरा वर्षांपासून आंबेडकरवादी पक्ष, संघटना दर वर्षी हा दिवस मनुस्मृती दहनदिन म्हणून साजरा करतात. त्यानुसार आता यंदापासून दर वर्षी २५ डिसेंबरला एकाच दिवशी सुशासनदिन व मनृस्मृतीदहन दिन साजरे होतील.
२५ डिसेंबरची सुटी रद्द केलेली नाही, असा खुलासा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला. आता सुटी असेल, तर मग शासनाच्या परिपत्रकानुसार सुशासनदिन म्हणून माहिती अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण, तणावमुक्ती व्यवस्थापन, सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी, इत्यादी कार्यक्रम सरकारी कार्यालयांमध्ये कसे साजरे करायचे, असा प्रश्न अधिकारी-कर्मचाऱ्यांना पडला आहे.
त्याच दिवशी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने मनुस्मृतीदहन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षांपासून २५ डिसेंबर दिवस मनुस्मृती दहनदिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी मुख्य कार्यक्रम पंढरपूर येथे होणार आहे.