राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत झालेला घोळ आणि त्यातून झालेली सरकारची नाचक्की यामुळे कातावलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संपूर्ण घोळाचीच चौकशी करण्याची घोषणा सोमवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षाचे सदस्यही अचंबित झाले.
रविवारी दुपारी आयोजित करण्यात आलेला मंत्रिमंडळ विस्तार अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर सोमवारी सकाळी घाईघाईत हा विस्तार झाला. त्यातही तीनपैकी दोनच जागा भरून एक जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. विधानसभेत कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तार घोळाचा मुद्दा उपस्थित केला.  मंत्रिमंडळाचा विस्तार कधी आणि केव्हा करायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी रविवारी जो घोळ घालण्यात आला त्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप खडसे यांनी केला. आधी दुपारी नंतर संध्याकाळी शपथविधी असल्याचे आपल्याला एसएमएसच्या माध्यमातून कळविण्यात आले. नंतर अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. सोमवारीही शपथविधीसाठी ऐनवेळी एसएमएसच्या माध्यमातूनच निमंत्रण देण्यात आले. ठरलेला शपथविधी रद्द होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्यातीलच कोणीतरी प्रयत्न करीत असल्याची कोपरखळी खडसे यांनी मारली.
 त्यावर खुलासा करताना मंत्रिमंडळ विस्तार ही गंभीर बाब असते. आपण प्रत्येकवेळी मंत्रिमंडळ विस्तार करताना राज्यपालांना भेटून विस्ताराची विनंती करतो. रविवारी दिल्लीतील बैठकांमुळे आपण वेळेत मुंबईत पोहोचू शकलो नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राज्यपालांना पत्रही दिलेले नव्हते. तरीही एसएमएसच्या माध्यमातून ही निमंत्रणे कशी दिली गेली, याची चौकशी केली जाईल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.  त्यावर तुमच्याच कार्यालयातून ही निमंत्रणे आली असे खडसे यांनी सांगताच छापिल निमंत्रणे पाठविलेली नव्हती, असा खुलासा चव्हाण यांनी केला. त्यास विरोधकांनी आक्षेप घेत सरकारची सर्व निमंत्रणे एसएमएसद्वारेच येतात, मग यापुढे त्यावर विश्वास ठेवायचा नाही का असा सवाल केला. अखेर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सभागृहाला माहिती देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले.