राज्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या सौरपंप योजनेच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या मुद्दय़ावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतले. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर असून त्यात ज्या अडचणी येतील त्या तपासून पाहिल्या जातील, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ातील आणि अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना सुमारे साडेसात हजार सौरपंप वितरित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यासाठी राज्य सरकारच्या हिश्श्याची २२.२५ कोटींची रक्कम हरित निधीमधून देण्यास मंजुरी देण्यात आली.
मात्र या योजनेत शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम द्यावी लागणार असून ६० टक्के रक्कम कर्जरूपाने उभारली जाईल आणि त्याचे हप्ते शेतकऱ्यांना भरावे लागणार होते. मात्र आता हा भार राज्य सरकार उचलणार आहे. कृषिपंपांच्या तांत्रिक क्षमतेबाबत कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आक्षेप घेतले असून शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा टाकल्यास तेही योजना स्वीकारणार नाहीत, असा मुद्दा अर्थमंत्र्यांकडून मांडण्यात आला.
केंद्र सरकारचे उद्दिष्ट देशभरात एक लाख सौरपंपांचे असून राज्याला ४६०० पंप ठरविण्यात आले होते. त्यात वाढ करून सात हजार ५४० पंपांसाठी आता केंद्र सरकार ३० टक्के निधी देणार आहे. पाच टक्के वाटा राज्य सरकारचा असून पाच टक्के रक्कम शेतकऱ्याला द्यावी लागेल.
हे सौरपंप तीन आणि पाच अश्वशक्तीचे पंप असून त्यांची किंमत सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यापैकी ६० टक्के म्हणजे दोन लाखांहून अधिक रक्कम कर्जरूपाने उभारली जाईल. आत्महत्याग्रस्त भागातील पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेले गरीब शेतकरी या योजनेसाठी निवडले जाणार आहेत. सध्या शेतकऱ्यांना वीजबिलासाठी जास्तीत जास्त चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. सौरपंपाच्या देखभालीचाही खर्च आहे. त्यामुळे ९ टक्के व्याजाने कर्जाचे हप्ते आणि पाच टक्के हिस्सा याचा भार शेतकरी घेणार का, ही योजना आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे शेवटी कर्ज जरी शेतकऱ्याच्या नावे काढले आणि राज्य सरकारने हमी दिली, तरी कर्जाचा भार सरकारनेच स्वीकारावा, अशी मागणी करण्यात आली. कर्जाचे हप्ते राज्य सरकारच भरणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.