चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रातील मतदारांनी धक्क्याला लावू नये म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मतदारराजालाच सुखद धक्का देण्यासाठी ‘आप’च्या पावलावर पाऊल ठेवत मुंबईसह राज्यातील घरगुती व औद्योगिक वीजदरात कपात करण्याचा विचार चालविला आहे तर या महिन्यापासूनच सरकारी रुग्णालयात मोफत औषधे पुरविण्याची घोषणा केली आहे.
सरकारी रुग्णालयांमधील सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत निराशाजनक स्थिती असतानाच आता मोफत औषधांची ‘भूल’   मतदारांना  देण्यासाठी सरकार सरसावल्याचे दिसत आहे.
सरकारी रुग्णालयांतील रुग्णांसाठी या महिन्यापासूनच ४३० प्रकारची औषधे मोफत उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले.
प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सातारा आणि वर्धा जिल्ह्यात सुरू आहे. सातारा जिल्ह्यात एका डॉक्टरने मात्र रुग्णांना ठराविक औषधांच्या दुकानातून औषधे आणण्याची सक्ती केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्या डॉक्टराच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
औषध खरेदीत पारदर्शकता आणल्याने खर्चात मोठी बचत झाली. या पैशातूनच मोफत औषधांचा पुरवठा होणार असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. औषधखरेदीत ठराविक कंपन्यांची मक्तेदारी होती. ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोडून काढल्यानेच खर्चात बचत झाली, असा दावा शेट्टी यांनी केला.
वीजदरही कमी?
दिल्लीत आम आदमी सरकारने वीज दरात ५० टक्के कपात केल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईसह राज्याच्या अन्य भागांतील घरगुती आणि औद्योगिक विजेचे दर कमी करण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वीजदर कपातीची सूचना केली होती. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षानेही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे या दरकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. वीजदरवाढ कमी करण्याबाबत तोडगा काढण्याकरिता उद्योगमंत्री नारायण राणे यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल गुरुवारीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. औद्योगिक वापराचे दर काही प्रमाणात कमी करण्याची शक्यता असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.