टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात अर्थचक्राला गती, शुक्रवारपासून दुकाने खुली

मुंबई : टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात करोनाच्या लाल क्षेत्रातील मुंबई महानगर, पुणे, नागपूरसह १८ महापालिकांमधील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. ५ जूनपासून या शहरांमध्ये दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू होतील. उपाहारगृहे, के शकर्तनालये, धार्मिक स्थळे आदी ३० जूनपर्यंत बंदच राहतील. रिक्षा-टॅक्सीच्या वाहतुकीला मर्यादित प्रमाणात परवानगी देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याने अर्थचक्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यासाठी सरकारच्या वतीने ‘पुन्हा सुरुवात’ (मिशन बिगीन अगेन) या नावाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली. केंद्राने ३० जूनपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढवितानाच राज्य सरकारांना निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार दिले होते. यानुसारच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा के ल्यानंतर नवी मार्गदर्शक  तत्त्वे जाहीर के ली. तीन टप्प्यांमध्ये ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन तारखांना टाळेबंदी शिथिल के ली जाईल. करोनाचे अधिक रुग्ण असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मात्र निर्बंध कायम राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्रांत आयुक्तांना, तर अन्य भागांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना असतील.

टाळेबंदी लागू झाल्यापासून गेले दोन महिने मुंबई, ठाण्यासह काही शहरांमधील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती. देशाच्या अन्य भागांमध्ये किं वा राज्यात लाल क्षेत्राच्या बाहेर नागरिकांना दिलासा देण्यात आल्याने मुंबईतील नागरिकांना काही प्रमाणात तरी दिलासा देण्याची मागणी करण्यात येत होती. नव्या आदेशानुसार मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह १८ महानगरांमधील सर्व प्रकारची दुकाने ५ जूनपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात लाल क्षेत्र असले तरी तेथील दुकाने उघडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच अमलात आणला होता.

प्रतिबंधित क्षेत्र कसे जाहीर होणार?

टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात के वळ करोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता लाल क्षेत्रातीलही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरात निवासी संकु ल, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, एखादी गल्ली, प्रभाग, पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र, संपूर्ण महापालिका क्षेत्र, गाव, तालुका करोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त किं वा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. मात्र यापुढे करोना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करताना मुख्य सचिवांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्याश्यक सेवा, औषधाची दुकाने, दूध वगळता अन्य सर्व बाबींवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न दु:खद

राज्यात आतापर्यंत करोनाचे ६५ हजार रुग्ण आढळले असले तरी आतापर्यंत करोनाचे २८ हजार रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद के ले. करोना नियंत्रणासाठी चाचणी केंद्रांची संख्या दोनवरून ७७ पर्यंत नेली व आता ती संख्या १०० पर्यंत जाईल, फिल्ड रुग्णालये उभारली, खाटांची संख्या वाढवणे अशा विविध उपाययोजना राज्य सरकार करत असले तरी २८ हजार रुग्ण बरे होऊन परतले याकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत हे पाहून दु:ख होते.

ती आपलीच माणसे आहेत, असे ठाकरे यांनी नमूद करत भाजपवर अप्रत्यक्ष टीका के ली. तसेच महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, कोणाची कितीही इच्छा असली तरी पडणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त के ला.

बुधवारपासून हे सुरू..

’सार्वजनिक व खासगी मैदाने, सार्वजनिक ठिकाणे, समुद्रकिनारे, उद्याने या ठिकाणी अंतरनियम पाळून व्यायाम, जॉगिंग, धावणे, सायकल चालविण्यास परवानगी. पहाटे ५ ते सायंकाळी ७ पर्यंत ही सवलत. मात्र, सामूहिक व्यायाम किंवा बंदिस्त प्रेक्षागृहात व्यायाम किंवा अन्य कोणत्याही कसरती करण्यास प्रतिबंध कायम.

’प्लबंर, विद्युतदुरुस्ती, पेस्ट

कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सर्व नियम पाळून कामे करण्यास परवानगी.

’गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये वेळ घेऊन गाडी दुरुस्तीची मुभा.

’सर्व शासकीय कार्यालये आवश्यकतेनुसार १५ टक्के  किं वा कमीत कमी १५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यास परवानगी.

रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच

करोनामुळे वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण थांबवण्यात आले होते. मात्र, रविवार, ७ जूनपासून पुन्हा वृत्तपत्रे घरपोच वितरित करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. वृत्तपत्रांचे वितरण करणाऱ्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द

मुंबई : करोनापासून कधी मुक्तता मिळेल, याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला.अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबली तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंतच्या सत्रांत (सेमिस्टर) मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर के ले. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी वाढवण्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट के ले.

५ जूनपासून दुकाने सुरू  

’ मॉल आणि व्यापारी संकु ले वगळताअन्यत्र दुकाने सुरू करता येतील.

’ सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास मान्यता. दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडी ठेवता येतील.

’ दुकाने पी-१ व पी-२ यानुसार उघडणार. म्हणजेच सम आणि विषमचा उपयोग के ला जाईल.

’ कपडय़ांच्या दुकानांमध्ये कपडे घालून बघता (ट्रायल रूम)  करता येणार नाही. कपडे बदलणे किंवा परत करता येणार नाहीत.

’ खरेदीसाठी नागरिकांनी चारचाकी किं वा दुचाकीचा वापर करू नये. चालत किं वा सायकलच्या माध्यमातून खरेदी करावी.

’ अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी लांब प्रवास करू नये.

’ मोटारीचा वापर करू नये.

’ अंतरनियम पाळले गेले नाही वा जास्त गर्दी झाल्यास प्रशासनाकडून तात्काळ दुकाने बंद के ली जातील.

या शहरांना नव्या आदेशाचा फायदा

मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, वसई-विरार, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या १८ महानगरपालिका. कु ळगाव-बदलापूर, अंबरनाथ, पालघर नगरपालिका हद्द.

८ जूनपासून खासगी कार्यालयांमध्ये १०% उपस्थिती परवानगी

’ सर्व खासगी कार्यालयांमध्ये एकू ण क्षमतेच्या १० टक्के  कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात येईल.

’ उर्वरित कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे.

’ खबरदारीचे सारे उपाय योजणे व्यवस्थापनावर बंधनकारक.

दुचाकी आणि चारचाकी वाहने

दुचाकी – फक्त चालक. तीनचाकी – चालक अधिक दोन प्रवासी

चारचाकी – चालक अधिक दोन प्रवासी

मुंबई, पुणे, ठाणे या १८ महापालिकांमध्ये दुचाकी किं वा चारचाकी या अत्यावश्यक असतील तरच वापरता येतील.

३० जूनपर्यंत हे बंदच

के शकर्तनालये, ब्यूटिपार्लर, स्पा, उपाहारगृहे ३० जूनपर्यंत बंदच राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खासगी शिकवण्यांवरील निर्बंधही कायम आहेत. आंतरराष्ट्रीय विमान सेवा, मेट्रो रेल्वे, उपनगरीय रेल्वे सेवा, मॉल्स, चित्रपटगृहे, बार, धार्मिक स्थळे, तरणतलाव, व्यायामशाळा, मनोरंजन केंद्रे ३० जूनपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत.

ई-पास बंधनकारक

आंतरजिल्हा प्रवासी सेवेला परवानगी आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासाकरिता ई-पास किं वा पूर्वपरवानगी आवश्यक. म्हणजेच मुंबईतून पुण्याला जाण्यासाठी ई-पास काढणे बंधनकारक.

मजुरांचे स्थलांतर किंवा श्रमिक रेल्वेने प्रवासाकरिता सरकारी यंत्रणांची परवानगी आवश्यक

टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, नागरिकांनी गर्दी करू नये. पुन्हा निर्बंध लागू करण्याची गरज लागता कामा नये. करोनाबाबतची सर्व खबरदारी बाळगत पुन:श्च हरी ओम म्हणत पुन्हा आयुष्याची सुरुवात करायची आहे. 

      -उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री