मुंबईतील प्रचंड लोकसंख्येमुळे टॉवर आणि झोपडपट्टय़ा वाढत असून उद्याने, क्रीडांगणे अशा मोकळ्या जागा कमी होत आहेत. मुंबईकरांच्या फुफ्फुसाला धोका होत असून आता शहरातील मोकळ्या जागा दुप्पटीने वाढविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
शहरातील शाळांच्या क्रीडांगणाच्या विषयावर तारांकित प्रश्नावर सभागृहात चर्चा होती. मुंबईतील विविध प्रश्न योगेश सागर  व अन्य आमदारांनी उपस्थित केले. तेव्हा मुंबईतील मोकळ्या जागा दुप्पटीने वाढविल्या जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील मोकळ्या जागा वाढविण्याचा सरकारचा मानस असल्याने आता क्रीडांगणे, उद्याने यांचे आरक्षणाचे प्रमाण वाढणार आहे. यापुढे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आणि अन्य पुनर्बांधणी प्रकल्पांचे आराखडे मंजूर करताना मोकळ्या जागांचे प्रमाण वाढविले जाणार असल्याचे नगरविकास विभागातील उच्चपदस्थांनी सांगितले.
सरकारने ज्या शाळांना क्रीडांगणांसाठी जमीन दिली आहे, ती क्रीडांगणे शाळेची वेळ वगळता सर्वासाठी खुली करता येतील, त्यासाठीही पावले टाकली जातील, असे  फडणवीस यांनी सांगितले.

माणशी २ मीटर प्रमाण
सध्या मुंबईतील मोकळ्या जागांचे प्रमाण दर माणशी एक चौ.मी.इतके आहे. मुंबईचा विकास आराखडा सरकारकडे  प्रलंबित आहे. त्याला मान्यता देताना हे प्रमाण दर माणशी २ मीटर इतके करण्यासाठी पावले टाकली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.