गैरव्यवहार आणि संचालक मंडळ नियुक्तीत झालेले कालहरण यामुळे त्रस्त झालेल्या डॉ. रवी बापट यांनी ‘हाफकिन’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सरकारला जाग आली आहे. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच याप्रकरणी लक्ष घातल्यानंतर आता संचालक नियुक्तीसाठी धावपळ सुरू झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव आता राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येत असल्याचे समजते. दरम्यान, ‘हाफकिन’चे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश साबदे यांनी केलेल्या गैरकारभारावर पांघरूण घालण्यासाठीच संचालक मंडळाची नियुक्ती जाणीवपूर्वक रखडवण्यात आल्याची चर्चा ‘हाफकिन’मध्ये रंगली आहे.
डॉ. बापट १९९९ पासून हाफकिन महामंडळाच्या अध्यक्षपदी होते. त्यानंतर वेळोवेळी त्यांना मुदतवाढ मिळाली. गेल्या वर्षी जूनमध्ये मुदत संपल्यानंतर बापट यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती करण्यात आली व तसा आदेशही निघाला. पण संचालक मंडळच नेमले गेले नाही. या गैरकारभाराला कंटाळून अखेर बापट यांनी राजीनामा दिला. त्याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच मंत्रालयात धावपळ उडाली. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालत संचालक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला.
प्रकाश साबदे हे व्यवस्थापकीय संचालक असताना मोठय़ा प्रमाणात गैरकारभार वाढला. मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती, मनमानी कारभारात अडथळा ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना महामंडळातून हाकलून लावणे असे प्रकार साबदे यांनी केले. तसेच नियमबाह्य कंत्राटे दिली. या साऱ्यांच्या तक्रारी झाल्यावर तत्कालीन संचालक मंडळाने साबदे यांना पदावरून दूर करण्याचे ठरवले. त्यानुसार अध्यक्ष बापट यांनी त्याबाबतचा अहवाल सरकारला पाठवला. नंतरही साबदे यांना पदावरून काढण्याबाबत वारंवार पाठपुरावा होऊनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यानच्या काळात साबदे यांची बदली झाली व नंतर ते निवृत्तही झाले. त्यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा लागू नये, संचालक मंडळाने साबदे यांच्या गैरकारभाराबाबत पुन्हा सरकारकडे पाठपुरावा करू नये यासाठीच संचालकांची नियुक्ती जाणीवपूर्वक रखडवल्याची चर्चा ‘हाफकिन’मध्ये रंगली होती.