राष्ट्रपती राजवटीतील कार्यनियमावलीचा आदेश जारी

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने, अखिल भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएसस), अखिल भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), वन सेवा, तसेच मंत्रालयातील सहसचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्यपालांकडे राहणार आहेत. राष्ट्रपती राजवटीतील राज्य शासनाच्या कार्य नियमावलीसंबंधीचा आदेश मुख्य सचिवांनी जारी केला आहे.

या पुढे ज्या बाबींसाठी मंत्रिमंडळाची, मंत्र्यांची व मुख्यमंत्र्यांचे आदेश प्राप्त करणे आवश्यक होते, अशी प्रकरणे आता मुख्य सचिवांच्यामार्फत राज्यपालांकडे सादर केली जाणार आहेत.

मंत्रालयातील सहसचिव व त्या वरील दर्जाचे अधिकारी यांच्यासह आयएएस, आयपीएस, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या व नियुक्त्या आता थेट राज्यपाल करतील. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतने ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात होत्या, त्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या आता राज्यपालांच्या मान्यतेने करण्यात येतील, असे या आदेशात म्हटले आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बाबी मुख्य सचिवांच्या मार्फत राज्यपालांना सादर करण्यात येतील. सर्वसाधारण प्रकारची प्रकरणे, जी मंत्र्यांच्या स्तरावर निकालात काढण्यात येत होती, ती मुख्य सचिवांच्या मार्फत राज्यपालच निकाली काढतील. मुख्य सचिवांच्या अधिकाराच्या पलीकडील तातडीच्या व कालमर्यादा असलेल्या सर्व प्रशासकीय व वित्तीय बाबी मुख्य सचिवांच्या मार्फत राज्यपालांना सादर करण्यात याव्यात, अशा सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत.