03 June 2020

News Flash

हेमामालिनी यांना नाममात्र दरात भूखंड

हेमा मालिनी यांना शास्त्रीय संगीत, कला, नृत्य इत्यादीसाठी सांस्कृतिक संकुल उभारायचे होते.

भाजप सरकार येताच हेमामालिनी यांनी काही महिन्यांपूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन दीर्घकाळ प्रलंबित असलेले हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली. खडसे यांनी आदेश देताच या नस्तीवरील धूळ दूर झाली आणि अवघ्या काही दिवसांतच हा भूखंड मंजूर केला.

भाजप सरकारकडून ‘स्वप्नसुंदरी’ची स्वप्नपूर्ती; नाटय़विहार कला केंद्र उभारणार
राज्यातील सत्तांतरानंतर काहींचे बुरे तर काहींचे भले करण्याच्या परंपरेचे पालन याही सरकारकडून होत आहे. प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वुड्स’साठी विलासराव देशमुख यांच्या काँग्रेस सरकारने गोरेगावचा भूखंड स्वस्तात दिला होता. त्याचप्रमाणे राज्यातील भाजप सरकारने सुप्रसिद्ध अभिनेत्री, खासदार हेमा मालिनी यांनाही अंधेरीतील कोटय़वधी रुपये किमतीचा भूखंड नाममात्र दरात बहाल केला आहे. हेमा मालिनी यांच्या नाटय़विहार कला केंद्र चॅरिटी ट्रस्ट या संस्थेला सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी आंबोली, अंधेरी (मुंबई) येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड सरकारने मंजूर केला आहे. गेली २० वर्षे अर्धवट राहिलेले त्यांचे स्वप्न अखेर भाजप सरकारने साकार केले.
हेमा मालिनी यांना शास्त्रीय संगीत, कला, नृत्य इत्यादीसाठी सांस्कृतिक संकुल उभारायचे होते. त्यासाठी त्यांनी १९९६मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजप युती सरकारकडे भूखंड मागितला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने त्यांना तो भूखंड मंजूरही झाला. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि हेमा मालिनी यांच्या भूखंडाचे प्रकरण नस्तीमध्येच (फाईल) अडकून पडले. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांच्या काळातही त्यांनी या भूखंडासाठी अनेक प्रयत्न केले होते.
नाटय़विहार कला केंद्र चॅरिटी ट्रस्टने त्यांच्या प्रस्तावित कला केंद्राचे बांधकाम जमिनीचा ताबा मिळाल्यापासून दोन वर्षांच्या आत पूर्ण करावयाचे आहे. शासनाने शिक्षण आणि धर्मादाय संस्था यांच्यासाठी जाहीर केलेल्या धोरणानुसार संस्थेने त्यांच्या प्रकल्प खर्चापकी २५ टक्के रक्कम भरावयाची असून उर्वरित ७५ टक्के रक्कम ट्रस्ट कशा प्रकारे उभी करणार आहे, याचा पुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. या सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतरच जमीन वाटपाचे अंतिम आदेश जिल्हाधिकारी काढतील, असे महसूलमंत्री खडसे यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2015 5:46 am

Web Title: maharashtra govt allots 2000 sq m land for hema malini at nominal rate
Next Stories
1 बनावट मद्य ओळखण्यासाठी रिमोटसदृश यंत्राचा वापर!
2 मुंबई भाजप अध्यक्षपदी पुन्हा आशीष शेलार?
3 पोलिसांची घरे कागदावरच!
Just Now!
X