‘फ्रेंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणाऱया पार्ट्यांवर लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्ट्यांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले जाते. त्याचबरोबर पार्ट्यांमध्ये सहभागी होणाऱया मुलींमुळे सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या पार्ट्यांवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. 
राज्य सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठांना पत्र लिहिले असून, या स्वरुपाच्या पार्ट्यांवर बंदी घालण्याची सूचना केली आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या पार्ट्यांमध्ये सहभागी होऊ नयेत, यासाठी विद्यापीठांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘फ्रेंडशिप डे’, ‘व्हलेंटाईन डे’ साजरे करण्याच्या निमित्ताने काही विद्यार्थी मद्यपानाची सुविधा असलेल्या पार्ट्या आयोजित करतात. मुलींनाही या पार्ट्यांमध्ये बोलावले जाते. मात्र, या पार्ट्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न निर्माण होतात. काही सामाजिक प्रश्नही त्यानिमित्ताने पुढे आले आहेत. यामुळेच अशा पार्ट्यांवर लगाम घालण्याची गरज असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना आणि संस्थांनाही याबद्दल तातडीने माहिती देण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी या निर्देशांचे पालन करण्यासाठी कोणती कार्यवाही केली, याची माहिती राज्य सरकारला देण्यात यावी, अशीही सूचना पत्रामध्ये करण्यात आली आहे.