मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुढील महिन्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले.
उच्च न्यायालयाने सलमानवर ठेवलेल्या सर्व आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता केली. तसेच सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षाही रद्द केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल, अशी शिफारस करणारा अहवाल सरकारी वकिलांकडून गेल्या आठवड्यातच गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा केल्यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्याच आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
या प्रकरणात सरकारी पक्षाकडून सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्यांअभावी सलमान खानची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षाने न्यायालयात दाखल केलेल्या पुराव्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.